राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाचे नेते, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली पक्षाची बैठक पार पडली. यावेळी जितेंद्र आव्हाड यांनी पुन्हा एकदा अटक होऊ शकते, असे म्हटले. त्यावर अजित पवारांनी भाष्य केले. जितेंद्र आव्हाड यांच्यावर दोन गुन्हे दाखल झाले होते. त्यावेळी मी आणि जयंत पाटील यांनी जितेंद्र आव्हाड यांची भेट घेऊन चर्चा केली. कोणी सत्तेत तर कोणी विरोधक असू शकते.
पुढे बोलताना अजितदादा म्हणाले की, आमच्या अडीच वर्षाच्या सरकारमध्ये सध्याचे सत्ताधारी विरोधी बाकावर होते. आता ते म्हणतात की, आमच्यातील काही लोकांना अडकवण्याचा प्रयत्न केला. काही अधिकाऱ्यांकडून माहिती मिळाल्याचेही ते म्हणत आहे. मी खूप वर्षांपासून राजकारणात आहे. पण मी सत्तेचा गैरवापर करून कोणालाही अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला नाही.” असे ते म्हणाले.
यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावरही भाष्य केले. “देशातील अनेक राज्याच्या निवडणुका लवकरच होणार आहे. त्या निवडणूका डोळ्यासमोर ठेवून हे अर्थसंकल्प सादर केले आहे. केंद्राचे बजेट हे चुनावी जुमला असल्यासारखे वाटते.” असे ते म्हणाले. फोन टॅपिंगच्या प्रकरणावरून ठाकरे गटातील सर्व नेत्यांना आयफोन वापरण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केले. तुमच्या चॅनेलने नोकिया वापरयाचे ठरविले तर तो तुमचा अधिकार आहे. शिवसेना हा एक स्वतंत्र पक्ष आहे. तो निर्णय त्यांनी घेतला असून त्यावर आपण वेळ घालून उपयोग नाही, असे ते म्हणाले.