आज आमदार शिवेंद्रसिंहराजे यांनी सातारा पालिकेत जाऊन घरपट्टी पालिकेकडून नियमबाह्यरित्या चतुर्थ वार्षिक कर आकारणी प्रक्रिया सुरू केली. तसेच ही अन्यायकारक कर आकारणी त्वरीत थांबवावी यासाठी प्रशासनाला त्यांनी निवेदनही दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला यावेळी त्यांनी खासदार उदयनराजे भोसले यांना खोचक सल्लाही दिला.
शिवेंद्रराजे म्हणाले, राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीतून होते. खासदार उदयनराजेंनी महाराष्ट्रभर फिरण्यापेक्षा दिल्लीत बसून राज्यपालांचा निर्णय घ्यायला केंद्र सरकारला भाग पाडावे असा सल्ला त्यांनी उदयनराजेंना दिला.
तसेच, राज्यपाल बदलाची प्रक्रिया दिल्लीत होत असते. त्यामुळे महाराष्ट्रात व साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यापेक्षा त्यांनी दिल्लीत जावे आणि राज्यपालांविषयी निर्णय घेण्यास केंद्र सरकारला भाग पडावे, असेही ते म्हणाले.
पुढे बोलताना शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्यासह सर्व महापुरुषांबाबत सर्वांनीच जपून बोलले पाहिजे. अपमान, होईल अशी वक्तव्ये करू नयेत. इतिहासाची मोडतोड करून कुठेतरी वेगळा इतिहास मांडण्याचा प्रयत्न करू नये. तसेच सगळ्याच पक्षाच्या पदाधिकारी, नेत्यांनी आपल्या बोलण्यामुळे जनतेच्या भावना दुखावल्या जाऊ नयेत याची काळजी घेतली पाहिजे. भाजपमधील ज्यांनी अशी वक्तव्ये केली आहेत त्यांना आमचे नेते देवेंद्र फडणवीस हे समज देतील, असे ते म्हणाले.
दरम्यान, राज्यपालांनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांना हटवण्यात यावे अशी मागणी करण्यात येत असून त्यासाठी फडणवीस यांनी योग्य ते प्रयत्न सुरू ठेवले आहेत. फडणवीस हे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर करणारे व जनतेच्या भावना जपणारे नेते आहेत. राज्यपाल बदलाची प्रक्रिया ही केंद्रातून होत असते, राज्य सरकारच्या अखत्यारीत हा विषय नाही, त्यामुळे आंदोलन करणाऱ्यांनी दिल्लीत जाऊन बसावे, तेथून हालचाली करून राज्यपालांना बदलावे. साताऱ्यात दंगा करून आंदोलन करण्यात काय अर्थ आहे, असा टोलादेखील त्यांनी उदयनराजेंना लगावला.