काँग्रेस खासदार राहुल गांधी (यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावर केलेल्या टीकेनंतर राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. राहुल गांधींविरोधात भाजप आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. राहुल गांधी यांच्याविरोधात अनेक पोलीस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या मुद्द्यावरून कार्यकर्त्यांना आक्रमक होण्याचे आदेश दिले आहेत. तसेच राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवण्याचे आदेशही दिले आहेत. त्यामुळे मनसेही आक्रमक झाली आहे. यावरून ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी मात्र मनसेची खिल्ली उडवली आहे. त्यांचा हा प्रसिद्धी मिळवण्याचा राजकीय उद्योग असल्याचे संजय राऊत म्हणाले.
संजय राऊत यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. मनसेने राहुल गांधी यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही ठिकाणी तक्रारीही नोंदविल्या आहेत. त्यावर तुम्हाला काय म्हणायचं आहे? असा सवाल राऊत यांना करण्यात आला. त्यावर राऊत म्हणाले, मला त्यावर काही भाष्य करायचे नाही. आपल्या देशात तक्रारी दाखल करणे आणि तक्रारीच्या आधारे प्रसिद्धी मिळवणे हा राजकीय उद्योग झाला आहे. आमच्याकडचे लोकं अनेकदा त्याचे राजकीय बळी ठरले आहेत.
दरम्यान, राहूल गांधी यांची भारत जोडो यात्रा बुलढाण्यात पोहोचली आहे. मनसेने दिलेल्या इशाऱ्यानंतर या यात्रेत पावलोपावली पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. या यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी हे सुद्धा राहुल गांधी यांच्यासोबत यात्रेत चालत आहेत. राहुल गांधी यांनी आज सकाळपासून ८ किलोमीटरचे अंतर गाठले आहे. तसेच आज सायंकाळी ४ वाजता राहुल गांधी यांची शेगावमध्ये सभा पार पडणार आहे. राहुल गांधी यांनी केलेल्या सावरकरांबाबतच्या वक्तव्यानंतर मनसेने राहुल गांधी यांच्या पदयात्रेला काळे झेंडे दाखवून, त्यांची शेगाव येथे होणारी सभा उधळून लावण्याचा इशारा दिला आहे.