शिवसेना खासदार संजय राऊतांचा जामीन रद्द करण्याच्या याचिकेवर आज (11 नोव्हेंबर) हायकोर्टात सुनावणी होणार आहे. गुरुवारी वेळेअभावी ही सुनावणी होऊ झाली नव्हती. संजय राऊत यांचा जामीन रद्द व्हावा अशा आशयाची याचिका ईडीने उच्च न्यायालयात दाखल केली होती. त्यावर आज सुनावणी होणार आहे. पत्राचाळ प्रकरणात संजय राऊत यांची अटक बेकायदेशीर असल्याचे सांगत पीएमएलए कोर्टानं ईडीच्या तपासावर प्रश्न उपस्थित केले आहे. दिवाणी खटल्यासाठी पीएमएलए कायदा लागू केला असल्याचे ताशेरे कोर्टाने ओढले आहेत.
तब्बल 100 दिवसांनी संजय राऊत यांना जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, ईडीनं कोर्टात जामीनाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. तसेच, या निकालाला हायकोर्टात आव्हान देण्याकरता आम्हाला संधी मिळायला हवी, असा युक्तिवाद ईडीच्या वतीनं करण्यात आला आहे. त्यामुळं आता ईडीच्या युक्तीवादावर कोर्ट काय निर्णय देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
तब्बल 100 दिवसानंतर शिवसेनेचे फायरब्रँड नेते संजय राऊत यांना बुधुवारी (9 नोव्हेंबर 2022) कोर्टाकडून जामीन मंजूर करण्यात आला होता. 100 दिवसानंतर संजय राऊत तुरुंगाबाहेर आले. संजय राऊत यांना जामीन मिळताच शिवसैनिकांनी जल्लोष केला. न्यायालयाच्या परिसरात फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली. खासदार संजय राऊत यांना जामीन मिळाल्यानंतर संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची आर्थर रोड तुरुंगातून सुटका झाली होती.