शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांवरून महाविकास आघाडीमध्ये खडाखडी झाली आहे. शिवसेना नेते संजय राऊत यांनी झालेल्या गोंधळावरून आणि शिवसेनेला एकही जागा न मिळाल्याबद्दल थेट नाराजी व्यक्त केली आहे. तसेच, काँग्रेस पक्षाच्या उमेदवारीचा घोळ झाला असून अजूनही तो सुरूच आहे त्यामुळे आम्हाला त्यात पडायचे नाही, असे संजय राऊत म्हणाले आहेत. त्यांच्या या विधानावरून आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाष्य केले आहे.
ते म्हणाले, संजय राऊत हे काँग्रेसचे प्रवक्ते नाही आहेत. मी आज अमरावतीत आहे. उद्या मुंबईत पत्रकार परिषद घेऊन महाविकास आघाडीच्या उमेदवारांची माहिती माध्यमांना देऊ, असे नाना पटोलेंनी सांगितले. शिवसेनेने शुभांगी पाटलांना पाठिंबा दिलेला आहे. त्यामुळे याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सूचनादेखील दिल्या आहेत. महाविकास आघाडीचा निर्णय घ्यायचा असेल तर सर्वांनी एकत्र येऊन लढले पाहिजे. त्याकरीताच आम्ही नागपूरची उमेदवारी मागे घेतली आहे.
तसेच मविआच्या निर्णयाबाबत विस्कळीतपणा दिसला. पुन्हा गोंधळ निर्माण होऊ नये, हा धडा मविआच्या प्रत्येक पक्षाने घेतला पाहिजे. प्रत्येक वेळा त्याग करण्याची जबाबदारी शिवसेनेवरच असते. नेहमी आम्ही त्याग करत आलो आहोत; परंतु यापुढे असे होणार नाही, असे संजय राऊत स्पष्ट म्हणाले होते. दरम्यान, उद्या नाना पटोले उमेदवारांबाबत नेमकी काय माहिती देणार आहेत, हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.