शिवसेना नेते आणि मंत्री एकनाथ शिंदे गेल्या तीन दिवसांपासून शिवसेनेच्या आमदारांना घेऊन आसाममधील गुवाहाटीमध्ये मुक्कामी आहे. त्यामुळे महाविकास आघाडी अडचणीत आले असून कोसळण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे तिन्ही पक्ष सरकार वाचवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत आहे अशातच या राजकीय घडामोडीवर रास्तवराडीचे नेते अमोल मिटकरी यांनी भाष्य केले आहे.
अमोल मिटकरी यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, भारतीय जनता पार्टीने घडवून आणलेल्या कपटकारस्थानाला भारतीय राज्यघटना उधळून लावणार. संघ प्रवृत्तीला भारतीय संविधान जोरदार उत्तर देणार. कपटकारस्थान यशस्वी होणार नाही. भारतीय संविधानाचा विजय असो, या शब्दांत हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांनी शिवसेनेच्या १६ बंडखोर उमेदवारांवर कारवाई करण्याची मागणी केली होती. याच १६ बंडखोर आमदारांना अपात्रतेच्या कारवाईसाठी नोटिसा बजावल्या जाऊ शकतात.
यासंदर्भात राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी सल्लामसलत करण्यात आले. यासंदर्भात कारवाई करायची असेल, तर त्याचे स्वरुप कसे असेल, यावर चर्चा करण्यासाठी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ सायंकाळी ४.३० वाजताच्या सुमारास विधिमंडळात दाखल झाले होते. त्यांच्यासह शिवसेनेचे नेते अनिल देसाई, अरविंद सावंत, सुनील प्रभू हेही विधिमंडळात हजर होते. तब्बल तीन ते चार तासांच्या चर्चेनंतर आता या १६ आमदारांना नोटिसा बजावण्यात येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. यासंदर्भात कायद्याची बाजू समजून घेण्यासाठी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा झाल्याचे समजते.