आजपर्यंत मी माझ्या भाषणात कधीही महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली नाहीत. मला महाविकास आाघाडीने विरोधी पक्षनेते पद दिले आहे. त्यामुळे माझ्याकडे राजीनामा मागण्याचा अधिकार भाजप नेत्यांना नाही, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक असेच म्हणावे ही माझी भूमिका आहे. मात्र शरद पवार यांनी सांगितल्या प्रमाणे जे धर्मवीर म्हणतात तो त्यांचा प्रश्न आहे. तुम्ही जर तुमच्या मोबाइलमध्ये धर्मवीर शब्द शोधलात तर जवळपास सात आठ लोकं आहेत ज्यांना धर्मवीर म्हटले गेले. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी जे स्वराज्य निर्माण केले त्या स्वराज्याचे रक्षक संभाजी महाराज होते. ज्यांना माझी भूमिका पटत नाही त्यांनी सोडून द्या. बाकीच्यांनी मला काहीही सांगू नये. मी असा कोणता गुन्हा केलाय. मी काही चुकीचे बोललो नाही. मला राजीनामा मागण्याआधी ज्यांनी महापुरुषांबद्दल बेताल वक्तव्ये केली त्यांच्याकडे का राजीनामा मागितला नाही? असाही सवाल अजित पवार यांनी केला आहे.
भाजप नेत्यांनी कायम महापुरुषांबद्दल अपमानास्पद वक्तव्ये केली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार प्रसाद लाड, गोपीचंद पडळकर यांनी आक्षेपार्ह वक्व्यव्ये केली, पण त्यांच्यावर कारवाई केली नाही. त्यांच्याकडे कोणी राजीनामा मागितला नाही, असाही सवाल अजित पवार यांनी उपस्थित केला आहे. मी आत्तापर्यंत कुठल्याही महापुरूषांच्या विरोधात चुकीचं काहीही बोललो नाही. त्याआधी आम्ही जो महामोर्चा काढला त्यावेळी राज्यपालांनी महापुरूषांबाबत बेताल विधाने केली होती.
विधानसभा अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मी भाषण त्यावेळी मास्टरमाइंड विधानसभेत नव्हता. मात्र मला एक कळत नाही भाजपच्या या मास्टरमाईंडने माझ्याविरोधात कट रचला. माझ्या विरोधात आंदोलन करा सांगितले. राजीनामा मागा. मी सांगू इच्छितो की माझं पद हे मला भाजपाने दिलेले नाही. राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने दिले आहे. संभाजी राजेंविषयी मी काहीही चुकीचे बोललो नव्हतो. वादग्रस्त वक्तव्य राज्यपालांनी केले, त्यांच्या नेत्यांनी केले. तसेच शरद पवार यांनी जे सांगितले आहे त्याच्याशी मी सहमत आहे, असेही अजित पवार म्हणाले.