एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार कोसळले. यानंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप -प्रत्यारोपाच्या फैऱ्या सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी पक्षाचे नेते तसेच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी काल भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी फोडणार का? या प्रश्नावरून सत्ताधाऱ्यांवर टीकेची झोड उडवली. यावर शिंदे गटाचे नेते दीपक केसरकर यांनी त्यांच्यावर पलटवार केला.
सरकार आणणं, सरकार कोसळवणं हेच अजित पवार यांचे काम असल्याचे केसरकर म्हणाले. जनतेसाठी काम करणं हे आमचं काम आहे. अजित पवार यांनी आमचाही मान ठेवावा. ज्यांचा शपथविधी सकाळचा झाला तेच राक्षसीवृत्तीबाबत बोलत आहेत. आमच्या आणि अजित दादांच्या वागण्यामध्ये फरक आहे, अशा शब्दात केसरकर यांनी पवारांना खडेबोल सुनावले आहे.
अजितदादा अडीच वर्षे सत्तेत होते. आम्हाला तीन महिनेच झाले आहेत. टाटाचा एअर बसचा प्रोजेक्ट गुजरातमध्येच प्रस्तावित होता. त्यांना मनपसंत जागा मिळाल्यानंतर तो प्रकल्प तिकडे गेला, असे स्पष्टीकरण देखील दीपक केसरकरांनी दिले आहे. तसेच राज्याचे दिवंगत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांनी अनेक मोठमोठे कारखाने उभारले. त्यावेळी कोणी का बोललं नाही? असा सवाल केसरकर यांनी उपस्थित केला.