Latest Marathi News

BREAKING NEWS

डॉ. सावंत, कोकरे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर

0


मराठी साहित्यिकांवर अभिनंदनाचा वर्षाव
मुंबई : प्रतिनिधी
साहित्यिक प्रदीप कोकरे यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे मराठी कादंबरीस साहित्य अकादमी युवा पुरस्कार तसेच बालसाहित्यकार, शिक्षणतज्ज्ञ डॉ. सुरेश सावंत यांच्या आभाळमाया काव्यसंग्रहास बाल साहित्य पुरस्कार जाहीर झाला. त्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचे अभिनंदन केले. साहित्य अकादमीच्या पुरस्कारांमुळे अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली मराठी भाषा साहित्यिक, सांस्कृतिकदृष्ट्या अधिक समृद्ध होण्यास मदत होईल. नवीन पिढी मराठी साहित्याकडे आकर्षित होईल, असा विश्वास व्यक्त केला.

साहित्य अकादमीच्या वतीने वर्ष २०२५ साठीचे २४ भाषांसाठीचे बाल साहित्य पुरस्कार आणि २३ भाषांसाठीचे साहित्य अकादमी युवा पुरस्कार बुधवार, दि. १८ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आले. मुलांसाठी लिहिताना बालसाहित्यिकांना स्वत: मूल होऊन जगावे लागते. मुलांचे मनोरंजन करताना त्यांचे ज्ञानार्जनही होईल, याकडे लक्ष द्यावे लागते. मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण होईल, यासाठी प्रयत्न करावे लागतात. प्रयोगशील शिक्षणतज्ज्ञ असल्याने डॉ. सुधीर सावंत यांनी ही किमया लीलया साधली आहे. त्यामुळेच त्यांचे लेखन प्रभावी ठरत आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या साहित्यसेवेचा गौरव केला.

कादंबरीकार प्रदीप कोकरे हे वास्तवदर्शी लेखक असून समाजातील गरीबी, बेरोजगारी, दुर्बल, उपेक्षित घटकांचे जीवनदर्शन त्यांच्या साहित्यात घडते. त्यांचे लेखन हे सामाजिक प्रश्नांना थेट भिडणारे, त्यावर परखड भाष्य करणारे असते. त्यांच्या खोल खोल दुष्काळ डोळे कादंबरीस जाहीर झालेला साहित्य अकादमी युवा पुरस्कार हा मराठी साहित्य क्षेत्राचाही गौरव असून तो आपल्या सर्वांना समाजाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देणारा ठरेल, अशा शब्दांत अजित पवार यांनी कादंबरीकार प्रदीप कोकरे यांचे अभिनंदन केले.

Leave A Reply

Your email address will not be published.