जळगाव | महाप्रबोधन यात्रेची जळगाव मुक्ताईनगर येथे होणाऱ्या सभेवरून जळगाव जिल्ह्यातील राजकारण चांगलंच तापलंय. जळगावमध्ये होणारी शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांच्या सभेला परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यामुळे आता सुषमा अंधारे चांगल्याच आक्रमक होताना दिसत आहेत.
महाप्रबोधन यात्रेचा विरोधकांनी धसका घेतल्यामुळे कुणाचीही तक्रार नसतानाही माझ्या सभेला परवानगी नाकारली गेली, त्यामुळे शिवसेना ठाकरे गट ऑन राईट ट्रॅक असल्याचं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. जळगावात होणाऱ्या सभेला परवानगी नाकारल्याबाबत न्यायालयात दाद मागणार असल्याचं सुषमा अंधारे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या आहेत. यावेळी त्यांनी विरोधकांवर देखील ताशेरे ओढले आहेत. काय म्हणाल्या सुषमा अंधारे?
सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या, माझ्या सभेला परवानगी का नाकारण्यात आली? याचे काही कारण मला सांगण्यात आले नाही. तसेच माझ्या विरोधात कुठलाही तक्रार अर्ज जळगाव पोलीस स्टेशनमध्ये नाही. तसेच माझ्यावर कुठलीही FIR देखील दाखल नाही. त्यामुळे कुठलाही तक्रार अर्ज आलेला नसताना, तसेच कोणतेही अटक वॉरंट नसताना निव्वळ सत्तेचा गैरवापर करत गुलाबराव पाटील यांच्या आदेशावरून पोलीस कर्मचाऱ्यांनी मला ओलीस ठेवलं गेलं. मला कळत नाही नेमका आक्षेप कोणता आहे? असा गंभीर आरोप सुषमा अंधारेंनी गुलाबराव पाटलांवर केला आहे.