महाविकास आघाडी सरकारमधील नाराजी आज सर्वांसमोर आली आहे आणि आजच्या निकालानं रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पक्षाचे पाचवे विजयी उमेदवार प्रसाद लाड यांनी दिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा लाड यांनी संजय राऊतांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
महाविकास आघाडीला चितपट करत भाजपाचे पाचही उमेदवार विजयी झाले आहेत. भाजपाचे चार उमेदवार निवडून येतील असं मताधिक्य पक्षाकडे होतं. पण पाचव्या जागेसाठी चढाओढ होती. यात प्रसाद लाड यांनी बाजी मारत महाविकास आघाडीला जोरदार धक्का दिला आहे. या विजयानंतर प्रसाद लाड यांनी शिवसेनेवर घणाघाती टीका केली होती.
“आजचा निकाल खूप काही सांगून जाणारा आहे. राज्यसभेपेक्षा अधिक मतं यावेळी भाजपाला मिळाली आहेत. मला शिवसेनेच्या उमेदवारांपेक्षाही जास्त मतं मिळाली आहेत. त्यामुळे रोज सकाळी बोलणारा पोपट आता तरी गप्प बसेल. राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आतातरी लक्षात येईल की बोलणाऱ्या पोपटाचा गळा दाबला पाहिजे नाहीतर असा घात होतो. अकेला देवेंद्र क्या कर सकता है, असं बोलणाऱ्यांना देवेंद्रजींची जादू पुन्हा एकदा पाहायला मिळाली आहे”, असं प्रसाद लाड म्हणाले.