Latest Marathi News

BREAKING NEWS

काँग्रेस उमेदवाराच्या पराभवानंतर काँग्रेस आमदार बुधवारी दिल्लीत ‘हजेरी’

0

 

राज्यसभेप्रमाणे विधान परिषदेची निवडणूक अत्यंत अटीतटीची झाली. महाविकास आघाडी आणि भाजप या दोघांनी ही निवडणूक अत्यंत प्रतिष्ठेची केली होती. या निवडणुकीत शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपचे उमेदवार विजयी झाले. या निवडणुकीत सर्वांत मोठा धक्का काँग्रेसला बसला.

या निवडणुकीत काँग्रेसचे भाई जगताप विजयी झाले तर दलित नेते म्हणून परिचित असलेले चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. खरे पाहता काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे सेफ उमेदवार मानले जात होते. भाई जगताप आणि भाजपच्या प्रसाद लाड यांच्यात खरी लढत झाल्याचे सांगितले जात होती. मात्र, प्रत्यक्षात भाई जगताप यांचा विजय झाला आणि चंद्रकांत हंडोरे यांना पराभवाचा मोठा धक्का बसला.

काँग्रेसने ठरवून दिलेल्या कोट्यानुसार, पक्षाकडे ४४ आमदारांचे पाठबळ होते. मात्र, विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसच्या उमेदवारांना त्यांच्या नेमून दिलेल्या कोट्यातील केवळ ४१ मते मिळाल्याचे पाहायला मिळाले. याचाच अर्थ काँग्रेसची तीन मते फुटल्याचे सांगितले जात आहे. विशेष म्हणजे भाजपचे प्रसाद लाड आणि काँग्रेसचे दोन उमेदवार सोडल्यास सर्व उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत विजयी घोषित करण्यात आले.

पहिल्या पसंतीच्या पहिल्या फेरीत काँग्रेसचे एकही उमेदवार विजयी झाले नाहीत. शेवटी दुसऱ्या पसंतीच्या दुसऱ्या फेरीची मतमोजणी झाल्यावर भाई जगताप विजयी झाल्याचे आणि चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाल्याची बाब समोर आली आहे. भाई जगताप यांना २६ मते मिळाली, तर चंद्रकांत हंडोरे यांना २२ मते मिळाली.

काँग्रेसचा हा पराभव नेत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर आता काँग्रेसच्या सर्व आमदारांना मंगळवारी रात्रीपर्यंत दिल्ली येथे तातडीने बोलाविण्यात आले आहे. बुधवारी या सर्व आमदारांची बैठक होणार आहे. बाळासाहेब थोरात यांच्या कार्यालयातून आमदारांना तसे फोन जात आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.