Latest Marathi News

BREAKING NEWS

ऋता आव्हाडांची महिला आयोगाकडे धाव, अध्यक्षांनी दिले पोलिसांना निर्देश

0

आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर मुंब्रा पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आक्रमक झाले असून, शिंदे-फडणवीस सरकारवर निशाणा साधत आहेत. प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही आव्हाड यांची भेट घेऊन त्यांना राजीनामा न देण्याचं सूचवलं. तसेच, पोलिसांवर कोणाचा दबाव आणि यामागील सुत्रधार कोण आहे, याच्या तपासाची मागणी केली आहे. दुसरीकडे जितेंद्र आव्हाड यांच्या पत्नीने महिला आयोगाकडे धाव घेतली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी रविवारी ठाण्यातील एका फ्लायओव्हरच्या उद्घाटनावेळी गैरवर्तन केले. याबाबत महिलांच्या सन्मानाची भाषा करणाऱ्या खासदार सुप्रिया सुळे आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर या गप्प का आहे? त्यांचा महिलांच्या सन्मानाविषयीचा कळवळा आता गेला कुठे? असा सवाल भाजपा महिला मोर्चा प्रदेश महामंत्री रिदा रशीद यांनी सोमवारी केला.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यावेळी उपस्थित होते. दुसरीकडे राष्ट्रवादी महिला काँग्रेसही आक्रमक झाली असून ऋता आव्हाड यांनी महिला आयोगाला पत्र लिहून रिदा रशीद यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. ऋता जितेंद्र आव्हाड यांचा तक्रार अर्ज आयोग कार्यालयास प्राप्त झाला आहे. आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यावर कलम ३५४ चा खोटा गुन्हा राजकीय सुडबुद्धीने दबावतंत्र वापरुन दाखल केला असल्याने सदर गुन्हा रद्द करुन फिर्यादी महिलेवर खोटा गुन्हा दाखल केला म्हणून कायदेशीर कारवाई करावी. असे तक्रारदाराचे म्हणणे आहे.

तसेच सदर प्रकरणी राज्य महिला आयोगाकडून पोलीस आयुक्त, ठाणे शहर यांचेकडून मुळ फिर्यादी महिलेने दाखल केलेला गुन्हा आणि परस्परविरुद्घ प्राप्त झालेले तक्रार अर्ज या दोन्हीबाबत सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्यात येत आह, असे आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्पष्ट केले. त्यामुळे, आात महिला आयोग यावर काय कारवाई करेल हेच पाहणे औत्सुक्याचे आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.