बारसूमध्ये सध्या माती परीक्षणाचे काम सुरू आहे. तिथे रिफायनरीचे कामही सुरू झालेले नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्र्यांसहीत आम्ही सरकारचे जेवढे प्रतिनिधी आहोत, या सर्वांची भूमिका स्पष्ट आहे.
लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय प्रकल्प होणार नाही. बारसू असेल वा नाणार तो भाग वगळून देवगड व राजापूरचा भाग असेल तिथे हा प्रकल्प होणार आहे. त्याठिकाणी ग्रीन रिफायनरी प्रकल्प होणार असून त्याला थांबविण्याची कुणात ताकद नाही, असे प्रतिपादन आमदार नितेश राणे यांनी केले.
रिफायनरी प्रकल्पाविषयी भूमीका स्पष्ट करण्यासाठी कणकवली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, केंद्राचा हा मूळ प्रकल्प असल्याने त्याबाबत केंद्रीय सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे हे पंतप्रधान व संबंधीत मंत्र्यांनाही भेटलेले आहेत. त्यावेळी माजी खासदार निलेश राणे, माजी आमदार प्रमोद जठार त्यांच्या सोबत होते. त्यामुळे सर्वांची सहमती घेऊनच, सर्वांना विश्वासात घेऊनच केंद्र व राज्य सरकार हा प्रकल्प राबविणार आहे. त्यामुळे कुणालाही आंदोलनाची गरज भासणार नाही. विरोधाची गरज भासणार नाही.
आता खासदार विनायक राऊत, आमदार वैभव नाईक हे विरोध करताना दिसत आहेत, ते स्वतःची किंमत वाढवत आहेत. खासदार राऊत आता उद्योगमंत्री उदय सामंतांवर टीका करतात. ते खासदार राऊत दिवसातून कितीवेळा उदय सामंत व किरण सामंत यांना फोन करतात व काय, काय बोलतात? याचा एकदा मी तपशिल जाहीर करणार आहे. मी खोटे बोलत असेन तर खासदार राऊत यांनी फोनचा ‘सीडीआर रिपोर्ट’ जाहीर करावा. एका बाजूला तुम्ही प्रकल्पाला विरोध करता आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही उदय सामंत व त्यांच्या लोकांकडून स्वतःसाठी खर्च मागता. हे असे कसे होणार ? असा आरोप सुद्धा राणे यांनी लगावला