अभिनेत्री रिचा चड्डाने गलवानचा उल्लेख करत केलेल्या ट्विटमुळे मोठा वाद सुरु आहे. अनेकांनी असं वाटतंय की रिचाने आपल्या ट्विटमध्ये भारतीय लष्कराचा दलाचा अपमान केला. या वादानंतर रिचाने माफी मागून वादावर पडदा टाकण्याचा देखील प्रयत्न केला परंतु इंडस्ट्रीतील अनेक कलाकारांनी त्याबाबत आपली नाराजी व्यक्त केली.
अभिनेता अक्षय कुमारने देखील याबाबत ट्विट करत नाराजी व्यक्त केली होती. आता साऊथ स्टार प्रकाश राज यांनी अक्षय कुमारची खरडपट्टी काढत रिचाला समर्थन दिले आहे. अक्षय कुमारने रिचाच्या ट्विटवर नाराजी व्यक्त करत एक ट्विट केले. आपल्या ट्विटमध्ये तो म्हणतो,”हे पाहून खूप दुःख झालं. आपल्या कोणत्याही कृतीने आपल्याला भारतीय लष्कराप्रती कृतघ्न बनवू नये. कारण आज ते आहेत म्हणून आपण आहोत.” असं अक्षय म्हणाला. आता यावर प्रकाश राज यांनी अक्षय कुमारला कडक शब्दात सुनावले आहे.
प्रकाश राज यांनी अक्षयचे ट्विट रिट्विट करत त्याला टोला लगावला आहे. प्रकाश राज आपल्या ट्विटमध्ये म्हणतात,”अक्षय कुमार मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. तुझ्यापेक्षा रिचा चड्ढा ही आमच्या देशाशी जास्त संबंधित आहे.” असं म्हणत प्रकाश राज यांनी रिचाला आपले समर्थन दिले आहे. आता प्रकाश राज यांच्या या ट्विटला अक्षय कुमार काय प्रतिउत्तर देतायत हे पाहावे लागणार आहे.