संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी सोलापूरमध्ये वकील गुणरत्न सदावर्ते यांच्या अंगावर शाईफेक करत राडा केला. सदावर्ते महाराष्ट्राचे तुकडे करायला निघाले आहेत. त्यांनी मराठा आरक्षणालाही विरोध केला होता, अशी घोषणाबाजी करत या कार्यकर्त्यांनी शाईफेक केली. गुणरत्न सदावर्ते हे राज्यातील विविध ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन उद्धव ठाकरे यांच्यासह कॉँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसवर हल्लाबोल करत आहे. त्याच पार्श्वभूमीवर गुणरत्न सदावर्ते यांनादेखील विरोध होत आहे.
गुणरत्न सदावर्ते यांची महाराष्ट्रात संवाद यात्रा सुरू आहे. सोलापूर दौऱ्यावर असताना त्यांच्या पत्रकार परिषदेत राडा झाला. त्यावर त्यांनी भाष्य केले. “शरद पवार, संजय राऊत आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात संवाद यात्रा सळो की पळो करून सोडत असल्याने त्यांची पिलावळ मला विरोध करत आहे.” असे त्यांनी सांगितले.
संभाजी ब्रिगेड यांनी शाई फेकली असून त्यांचा बोलवता धनी ज्यांचे मी नावे घेतली तेच आहेत. संविधान दिनी मी संविधनावर बोलत असताना माझ्या अंगावर शाईफेक झाली आहे. माझ्या हातात शिवाजी महाराजांची प्रतिमा होती त्यावरही शाई फेकण्यात आली, असेही त्यांनी सांगितले. माझ्यावर शाई फेकण्यामागे शरद पवार, अजित पवार आणि उद्धव ठाकरे हे असून त्यांच्या तोंडात बोळा गेला आहे का ? असेही त्यांनी विचारले.
मी संविधानाची भाषा बोलतो म्हणून मला टार्गेट केले आहे. हे शरद पवारांच्या पराभवाचे लक्षण असल्याचे सदावर्ते म्हणाले. पोलीसांच्या डोळ्यासमोर हा प्रकार घडल्यामुळे यावर कारवाई करावी. काही दिवसांपूर्वी खून करून मारून टाकू, अशी नक्षलवादी लोकांची मला नोटिस आली, असेही त्यांनी सांगितले.