नागपूर | पित्याने राजकीय पक्ष काढला म्हणून पक्षावर आमचा अधिकार आहे, असे होत नाही. त्या पक्षावर उर्वरित दोन भावांचा अधिकार नाही का? ठाकरे कुटुंबातील इतर सदस्यही एकनाथ शिंदे यांच्यासोबत आहे. एकुणच काय तर बाळासाहेबांचा वारसा चालवणारे दोन तृतीयांश ठाकरे शिंदे गटात आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी एकट्याचाच हक्क सांगणे योग्य नाही, असे खडे बोल मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उद्धव ठाकरेंना सुनावले. ते नागपुरात माध्यमांशी बोलत होते.
यावेळी ते म्हणाले, बहुमत म्हणजे वडिलोपार्जित संपत्ती नाही. इतर ठाकरे कुटुंबीयही शिंदे गटात आहेत. पक्षाचे शिवसेना नाव तुम्ही ठेवले आहे, छत्रपतींचे नाव तुम्ही वापरले. मग तर त्यांचे वंशज अध्यक्ष रहायला पाहिजे होते. पण प्रत्यक्षात तसे घडून आलेले नाही. एकटे उद्धव ठाकरेच पक्षावर दावा करत आहेत. आधीच त्यांनी नीट पक्ष सांभाळला असता, तर त्यांच्यावर ही वेळ आलीच नसती. आमच्या नावानेच लोक निवडून येतात, असा गैरसमज उद्धव ठाकरे का करून घेतात? मग फक्त ५६ मतदारसंघांत तुमचे नाव चालते का आणि इतर ठिकाणी तुमचे नाव का नाही चालत? असे काही आहे का? असे प्रश्नही मुनगंटीवार यांनी उपस्थित केले. जो जमीन कसेल, जो काम करेल, त्याचा पक्ष, असे सांगत काँग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या दावणीला बांधलेल्यांचा पक्ष होईल का, असाही सवाल त्यांनी केला.
वाघांचे योग्य ठिकाणी स्थानांतरण करण्याचे काम आम्ही सुरू केले आहे. मग तो वाघ जंगलातला असो किंवा राजकारणातला. चाळीस वाघांचे स्थलांतरण तर आम्ही योग्य ठिकाणी केले आहे. उर्वरित जखमी वाघांसाठी आम्ही काही रेस्क्यू सेंटर उभारत आहोत. तिथे त्यांचा योग्य उपचार केला जाईल, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनी ठाकरेंचे नाव न घेता त्यांना चिमटा काढला.