दुर्गराज रायगडावर राजसदरेवरील काँक्रीटचा थर पुरातत्व विभागाने काढूनही कित्येक आठवडे उलटून गेले तरी त्यावर कोणतेही काम केलेले नाही. त्यामुळे राजसदरेच्या संवर्धनासाठी प्राधान्याने हे काम तत्काळ करावे.सिंहासन चौथऱ्यावरील सिमेंट काँक्रीटचा थर काढून त्याचे ऐतिहासिक स्वरूप परत खुले करावे, अशा सूचना माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी पुरातत्व विभागाला दिल्या.
येत्या 2024 मध्ये युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350वा शिवराज्याभिषेक सोहळा होत आहे. या पार्श्वभूमीवर गुरुवारी धरोहर भवन, दिल्ली येथे भारतीय पुरातत्व विभागाचे अतिरिक्त महासंचालक आलोक त्रिपाठी यांच्यासोबत बैठक झाली. यावेळी रायगडावरील रखडलेल्या कामाचा आढावा घेण्यात आला.
यावेळी होळीचा माळ येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीस रायगड विकास प्राधिकरणकडून ऐतिहासिक स्वरूपाचे छत्र बसविले जाणार आहे. त्यासाठी प्राधिकरणास मान्यता मिळालेली आहे. या परिसराचे सुशोभीकरण पुरातत्व विभागाच्या अखत्यारीत असून, पुरातत्व विभागाने ही प्रव्रिâया तत्काळ सुरू करावी असे या बैठकीत ठरले.
दरम्यान, रायगड प्राधिकरणाने संवर्धन कामांसाठी दिलेल्या निधीतून पुरातत्व विभागाने गडावर उत्खननदेखील करायचे आहे. पण या निधीतून केवळ वीस टक्केच काम झाले असून, गडावर लवकरच उत्खनन व संवर्धन कार्य सुरू करावे, अशी सूचना संभाजीराजे यांनी केली.