नवी दिल्ली | राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी भाजपचे खासदार उदयनराजे भोसले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भेट घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज भाजपच्या खासदारांसोबत नवी दिल्ली येथे बैठक पार पडली. या बैठकीनंतर खासदार उदयनराजे यांनी माध्यमांशी संवाद साधला. राज्यपालांविरोधात पंतप्रधान कार्यालयाला पत्र पाठवलं असल्याचं त्यांनी सांगितलं.
उदयनराजे पुढे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे. शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकानं सांभाळून बोललं पाहिजे, शिवभक्त नाराज आहेत. या प्रकरणाकडे दुर्लक्ष करणं योग्य नव्हे, या मुद्द्याकडे राजकीय नजरेतून पाहू नये अशी आशा आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी काढलेल्या उदगाराबाबत राष्ट्रपतींना दिलेल्या पत्राची दखल घेण्यात आली आहे.
आज पीएमओला उदयनराजे यांच्याकडून आणखी एक पत्र देण्यात आले आहे, असं उदयनराजे म्हणाले. आता पुढील कारवाई प्रक्रियेनुसार होईल, असे त्यांनी यावेळी सांगितले. दरम्यान, राज्यपालांनी अजून माफी मागितली नाही याची खंत वाटते. राज्यपालांच्या वक्तव्याबाबत जनतेमध्ये असंतोष निर्माण झाला असून राज्यपालांच्या वक्तव्याबाबत भाजप जबाबदार नाही. या संदर्भात 23 नोव्हेंबरला राष्ट्रपतींना देखील पत्र लिहिलं होतं. राष्ट्रपतींनी आधीच दखल घेतली आहे. आजही प्रक्रियेनुसार पंतप्रधान मोदींना पत्र पाठवलं आहे, तसेच मोदींकडे आमची भूमिका पोहचली आहे, तसेच पंतप्रधानांना याची तीव्रता माहिती आहे. असं उदयनराजे म्हणाले.