मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवतीर्थवर दिपोत्स्वाचे आयोजन केले होते . या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थिती लावली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली.सर्वांनाच दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा, असं म्हणत एकनाथ शिंदेंनी त्यांच्या भाषणाला सुरुवात केली.
यानंतर, या शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या संकल्पनेतून दिपोत्सव मागील 10 वर्षांपासून आयोजित केला जातो. सगळ्यांना सोबत घेऊन राज ठाकरे आणि त्यांचे सहकारी करताय, मी त्यांचं अभिनंदन करतो, असे शिंदे म्हणाले.तुम्ही कधीही आम्हाला सांगता ते लोकांच्या, हिताचे विषय सांगता. शेतकऱ्यांसाठी देखील तुम्ही आम्हाला हिताचे निर्णय घेण्यास सांगितले. त्यावर आम्ही काम करत आहोत, असे शिंदे राज ठाकरेंना म्हणाले.
तसेच आम्ही रात्री उशिरापर्यंत काम करत असतो, त्यामुळे राजसाहेब तुम्ही कधीही अगदी रात्री, मध्यरात्री अपरात्रीही आम्हाला भेटायला येऊ शकतात, असे म्हणत शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे उद्धव ठाकरेंना टोला लागावला. तुमच्या शेतकऱ्यांच्या बाबत ज्या काही भावना आहेत, हे सरकार नक्कीच त्याचा आदर करेल, शेतकऱ्यांना सर्वसामान्यांना जेवढं काही देता येईल, तेवढं त्यांना देऊ, असेही शिंदे म्हणाले.
हा दिपोत्सव आपल्या सर्वांचं जीवन प्रकाशमय करो, ज्याप्रमाणे आपण याठिकाणी रोषणाई केली, तशीच सर्वांच्या मनामध्ये अगदी ही रोषणाई उजळून निघू द्या, सर्वांना सुखाचे समृद्धीचे दिवस येवो, यासाठी हे सरकार प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही शिंदे यांनी जनतेला दिले आहे.