मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या आईवर मुंबईतील बॉम्बे रुग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आज १ ऑगस्ट रोजी उपचारा दरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्या ७४ वर्षांच्या होत्या.
शारदा टोपे या कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखान्याच्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात मुलगा, जावई, सून, नातवंड असा प्रॉपर आहे. त्यांच्यावर उद्या (2 ऑगस्ट) संध्याकाळी 4 वाजता पार्थपूर ता. अंबड जि. जालना या मूळगावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. कोरोनामुळे राज्यात अंत्यसंस्कारासाठी जी नियमावली केली आहे (मर्यादीत उपस्थितीची) त्याचे पालन करून अंत्यसंस्कार केले जातील, असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
बॉम्बे रुग्णालयात उपचार घेताना त्यांना दोन महिन्यांसाठी घरी सोडण्यात आले होते. परंतु पुन्हा त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आणि काल म्हणजे १ ऑगस्टला त्यांची प्राणज्योत मालवली.
कोरोनामुळे जिल्ह्यांचे आढावा दौरे, सततच्या बैठका यात वेळात वेळ काढून आरोग्यमंत्री टोपे आईला भेटायला रुग्णालयात जायचे. रोज सकाळी आईला भेटून दिवसाची सुरुवात ते करायचे.
ती अजातशत्रु होती. एका शब्दानेही तिने कुणाला दुखावलं नाही. सर्वांना प्रेम दिले. माझ्या वडिलांच्या सोबत ती सावली सारखी राहिली. चार वर्षांपूर्वी वडिल गेल्यानंतर ती आधार होती. दोन दिवसांपूर्वी तिने माझ्या पाठीवर दोन्ही हात ठेवत मला आर्शिवाद दिले. तो आशिर्वाद आता कायम माझ्या पाठीशी राहील, अशी भावना आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली.