पत्राचाळ पुनर्विकासात झालेल्या आर्थिक घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत चांगलेच अडचणीत आले असून, रविवारी सकाळी ७ वाजता ईडीच्या अधिकाऱ्यांनी अचानक त्यांच्या भांडूप येथील घरी छापेमारी केली.
अशातच त्यात ईडीच्या अधिकाऱ्यांना ११ लाख ५० हजार रुपयांची रोख रक्कम सापडली. याचसोबत काही कागदपत्रे अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतली. ते चौकशीत सहकार्य करत नसल्याचे सांगत सायंकाळी पावणेसहाच्या दरम्यान राऊत यांना ईडीने बॅलॉर्ड इस्टेट येथील कार्यालयात चौकशीसाठी आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. यानंतर त्यांना मध्यरात्री अटक करण्यात आली. यावरून मनसेने राऊतांना खोचक टोला लगावला आहे.
मनसेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे यांनी संजय राऊतांवर जोरदार निशाणा साधला आहे. आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ट्विट केलं आहे. “राज साहेबांनी संजय राऊत यांना एकट्यात बोलण्याची सवय लावावी असा सल्ला दिला होता, आज तो सल्ला कदाचित राऊतांना जेलमध्ये उपयोगी येईलच….!!!” असं शालिनी ठाकरे यांनी म्हटलं आहे.