Latest Marathi News

BREAKING NEWS

पुण्यात मनसेला जोरदार धक्का, ७ जणांच्या हकालपट्टीनंतर ५० जणांचे राजीनामे

0

केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष नाव आणि धनुष्यबाण पक्षचिन्हाबाबत शिंदे गटाच्या बाजूने दिलेला निकाल, माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी केलेला दावा आणि कसबा आणि पिंपरी विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीचा प्रचार यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चँगलेच ढवळून निघाले आहे.पोटनिवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. मात्र, ऐन निवडणुकीच्या काळात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.

अशातच आता मनसेच्या ७ पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात आली. यामुळे ५० जणांनी राजीनामे दिल्याचे सांगितले जात आहे. कसबा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचाराची रणधुमाळी सध्या सुरू आहे. भाजपचे हेमंत रासने आणि महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर यांच्यातच मुख्य लढत होणार आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी न देता भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दिला आहे.

मात्र दुसरीकडे मनसेचे कसबा विधानसभा मतदारसंघातील सात कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार केल्याने रवींद्र खेडेकर, सागर पांगारे, गोपी घोरपडे, अनिल चांदांगे, रिझवान बागवान, प्रकाश ढमढेरे, नीलेश निकम यांची हकालपट्टी करण्यात आली होती. त्यानंतर कसबा विधानसभा मतदारसंघातील चाळीस ते पन्नास जणांनी राजीनामे दिले. राजीनामा पक्षाच्या शहराध्यक्षांकडे पाठविण्यात आला आहे. कसब्यात मनसेला खिंडार पडल्याचे सांगितले जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे वरिष्ठ नेते बाळा नांदगावकर, अनिल शिदोरे, राजेंद्र वागसकर यांच्या आदेशाने पक्षविरोधी काम करणाऱ्या या सर्वांची पक्षातून हकालपट्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. रवींद्र धंगेकर यांच्या प्रचारफेरीमध्ये कार्यरत असलेल्या पदाधिकाऱ्यांवरती नजर ठेवून असलेल्या काही व्यक्तींनी राज ठाकरेंना माहिती पुरविली आणि रवींद्र खेडेकर आणि प्रकाश ढमढेरे यांच्यासह सात पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केले.

Leave A Reply

Your email address will not be published.