राज्यात अजित पवार यांनी राष्ट्रवादीची साथ सोडून थेट शिंदे फडणवीसांना पाठिंबा देत उपमुख्यमंत्री पदाची शपथ गेहतली या शपथविधीनंतर शिंदे गट आणि भाजपच्या अडचणी चांगल्याच वाढल्या होत्या तर मंत्रिपदाच्या खातेवाटपाच्या मुद्दयावरून शिंदे गटासह भाजपच्या गोटात खळबळ उडाली होती. अशातच आता जिल्हा बँक दूध संघ तसेच बाजार समिती आणि सहकारी संस्थांचे सर्व पदाधिकारी अजित पवार यांच्याबरोबर असल्याचा दावा करत जिल्ह्याचे पालकमंत्रिपद उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाच मिळावे, अशी मागणी अजित पवार गटाकडून करण्यात आली आहे.
पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या सभागृहात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवार गटाने गुरुवारी जिल्ह्यातील प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर म्हणाले, पुणे जिल्ह्यातील आमचे बलाबल लक्षात घेता अजित पवार यांना पालकमंत्री करावे, अशी आमची मागणी आहे.
अजित पवार गटाच्या बैठकीमध्ये लावण्यात आलेल्या फ्लेक्सवरून ज्येष्ठ नेते शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा फोटो काढण्यात आला. फोटोबद्दल शरद पवार यांनीच हरकत घेतल्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून आलेल्या सूचनेमुळे त्यांचा फोटो लावला नसल्याचे प्रदीप गारटकर यांनी सांगितले. सध्या आमच्या पक्षाचे कार्यालय गाडीमध्येच असून, लवकरच नवे कार्यालय सुरू केले जाईल, असेही त्यांनी नमूद केले.