Latest Marathi News

BREAKING NEWS

मोठी बातमी | पुलवामात दहशतवाद्यांकडून काश्मिरी पंडिताची हत्या

0

काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांवर होणारे हल्ले थांबण्याचे काही नाव घेत नाहीये. अशातच पुलवामा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी आणखी एका काश्मिरी पंडिताची हत्या घडवून आणली. संजय शर्मा (४०) असे हत्या करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. एटीएम सुरक्षारक्षक असलेले शर्मा सकाळी अकरा वाजता बाजारपेठेत जात असताना घरापासून अवघ्या १०० मीटर अंतरावर अगदी जवळून त्यांच्या छातीवर गोळी झाडण्यात आली.

या घटनेनंतर एकाच गोंधळ उडाली त्यानंतर आसपासच्या लोकांनी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यांचे प्राण वाचू शकले नाहीत, असे पोलिसांनी सांगितले. अचन भागात घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. आपल्या समुदायातील सदस्यांवर झालेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर संजय शर्मा प्रदीर्घ काळापासून कामावर येण्याचे टाळत होते, असे त्यांच्या सहकाऱ्यांनी सांगितले.

तसेच हा पूर्वनियोजित हल्ला होता, असे पोलिस उपमहानिरीक्षक रईस भट यांनी सांगितले. गावात सशस्त्र सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत. येथेही आम्ही सुरक्षाव्यवस्था तैनात केलेली आहे, असे ते म्हणाले. अत्यंत दु:ख झाले. संजय बँकेत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. आज एका अतिरेकी हल्ल्यात त्याचा मृत्यू झाला. मी या हल्ल्याचा निषेध करतो आणि त्याच्या प्रियजनांप्रती शोक व्यक्त करतो, असे नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे.

भाजपच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार काश्मिरी पंडितांचे संरक्षण करण्यात अपयशी ठरले आहे, असा आरोप पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी केला. काश्मीरमध्ये यावर्षी अल्पसंख्याक समुदायाच्या सदस्यावर झालेला हा पहिला हल्ला होता. गेल्यावर्षी नागरिकांवर जवळपास ३० हल्ले केले. यात तीन काश्मिरी पंडित, राजस्थानातील एक बँक व्यवस्थापक, जम्मूमधील एक महिला शिक्षिका व आठ परप्रांतीय कामगारांसह १८ लोक ठार झाले.

Leave A Reply

Your email address will not be published.