मुंबई | मागच्या अनेक महिन्यापासून रखडलेला शिंदे फडणवीस सरकारच्या मंत्री मंडळाच्या विस्ताराला आता मुहूर्त मिळाला असून पुढील आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मंत्रिमंडळ विस्तारासोबतच काही मंत्र्यांच्या खात्यात फेरबदल देखील होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
राज्यातील सत्तासंघर्षाच्या निकालावर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असल्यानं मंत्री मंडळाच्या विस्ताराला विलंब झाल्याचं बोललं जात होतं. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर हे शिवसेनेच्या अपात्र आमदारांबाबत निर्णय घेणार आहेत. त्यामुळे मंत्रिमंडळ विस्ताराचा मार्ग मोकळा झाल्याचं बोललं जात आहे. पुढील आठवडयात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार भरत गोगवले, संजय शिरसाठ, प्रताप सरनाईक, बच्चू कडू, सदा सरवणकर, यामिनी जाधव, अनिल बाबर आणि चिमन आबा पाटील शिवसेनेच्या या आमदारांना मंत्रिपद मिळण्यची शक्यता आहे. दरम्यान राज्य मंत्रिमंडळासोबतच केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या हालचालींना देखील वेग आला आहे.
केंद्रात देखील लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होऊ शकतो. या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेला कॅबिनेट आणि राज्यमंत्री आशी दोन मंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे. कॅबिनेट मंत्रिपदासाठी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे आणि राज्य मंत्रिपदासाठी खासदार प्रतापराव जाधव व भावना गवळी यांची नाव चर्चेत आहेत.