Latest Marathi News

BREAKING NEWS

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या बैठकीला बाळासाहेब थोरात समर्थकांची दांडी

0

नाशिक पदवीधर मतदारसंघातील महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या प्रचारार्थ कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या आघाडीच्या बैठकीला आघाडीच्या सर्व आमदारांनी पाठ फिरविली. नाना पटोले हे प्रदेशाध्यक्ष म्हणून नगर जिल्ह्यात पहिल्यांदा आले असतांनाही कॉंग्रेसचे आमदारासह कॉंग्रेस विधीमंडळाचे नेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या समर्थकांची अनुपस्थितीत प्रकर्षाने दिसून आली.त्यामुळे पटोले यांच्या कार्यपद्धतीबद्दल अप्रत्यक्षारित्या कॉंग्रेसच्या नेत्यांसह कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्‍त केल्याचे जाणवत होते.

नाशिकमध्ये महाविकास आघाडीची बैठक दुपारी तीन वाजता झाली. पटोले यांच्यासह कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस व शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्षांसह पदाधिकारी उपस्थित होते. मात्र महाविकास आघाडीचा एकही आमदार उपस्थित नव्हता. आमदार थोरात समर्थक मोठ्या संख्येने अनुपस्थित होते. श्रीरामपूर, नगर शहर वगळता अन्य तालुक्‍यातील पदाधिकारी व नेत्यांनी या बैठकीकडे पाठ फिरवली.

आमदार थोरात यांचे वर्चस्व असलेल्या संगमनेर, अकोले, श्रीगोंदा, कर्जत, जामखेड या तालुक्‍यातील नेते व कार्यकर्ते या बैठकीला आलेच नाही.त्यामुळे कॉंग्रेस अंतर्गत शह कटशहराचे राजकारण लपून राहिले नाही. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी ऑनलाईन भाजप नेते व कार्यकर्त्यांची आज दुपारी बैठक घेतली. या बैठकील नाशिक पदवीधर मतदारसंघातील अपक्ष उमेदवार सत्यजीत तांबे यांना भाजपने पाठिंबा जाहीर केल्याचे स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार पक्षाच्या नेते व कार्यकर्त्यांनी तांबे यांचा प्रचार करण्याच्या सुचना बावनकुळे यांनी दिल्याचे सांगण्यात आले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.