मुंबई |श्रद्धा वालकर हत्याप्रकरणामुळे देशात खळबळ माजली आहे. या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणातील मारेकऱ्याला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. “मारेकऱ्यावर खटले चालवू नका. परिस्थितिजन्य पुराव्यांच्या आधारे त्याला भरचौकात फासावर लटकवा.” असे राऊतांनी म्हटले आहे.
“महाराष्ट्रातील मुलीची हत्या धक्कादायक आणि दुर्दैवी आहे. समाजमाध्यमातून ओळखी होतात, त्यातून अशी भयंकर नाती निर्माण होतात. ही मुलं कोणत्या धुंदीत आणि गुंगीत जगत आहेत, हे आज परत एकदा कळले आहे. श्रद्धाची हत्या विकृतीच्या पुढचे पाऊल आहे. या प्रकरणात राजकारण बंद केले पाहिजे.
या प्रकरणात राजकारण करणारे समाजाचे शत्रू आहेत. पीडित मुलीच्या वडिलांचा, कुटुंबाचा आक्रोश समजून घेतला पाहिजे. अशा खुनी लोकांवर खटलेही चालवू नयेत. त्याच्यावर कोणी राजकारण करत असेल तर तेही बंद केले पाहिजे. जो परिस्थितिजन्य पुरावा समोर आला आहे, त्याच्या आधारेच अशा खुनी लोकांना भरचौकात फासावर लटकवले पाहिजे.” असे ते म्हणाले.
इतकेच नाही तर, महाराष्ट्रातीलच नाही तर संपूर्ण देशातील मुलींनी सावधपणे जगायला शिकले पाहिजे. मुलींना असे फसवून जे काही केले जाते ती विकृती आहे, विकृतीच्या पुढचे पाऊल आहे. श्रद्धाच्या खुन्याबद्दल जी माहिती समोर येते ती थरारक आहे, असेही ते म्हणाले. २६ वर्षीय श्रद्धाचा प्रियकर आफताब पूनावाला याने गळा आवळून खून केला. त्यानंतर तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी मृतदेहाचे तब्बल ३५ तुकडे केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला या घटनेमुले संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली होती.