राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आल्यापासून पुन्हा एकदा मुंडे समर्थकांनी पंकजा मुंडे यांची मंत्रिपदावर वर्णी लागावी अशी मागणी केली आहे. परंतु मंत्रिमंडळाच्या पहिल्या विस्तारात पंकजा मुंडे यांना स्थान न मिळाल्याने कार्यकर्ते नाराज झाले. पंकजा मुंडे यांना सुरुवातीला विधान परिषद उमेदवारी आणि आता मंत्रिमंडळात स्थान न दिल्यानं पंकजा मुंडे नाराज असल्याची चर्चा सातत्याने पुढे येत आहे.
त्यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी पंकजा यांना राष्ट्रवादीत येण्याची ऑफर दिली आहे. याच दरम्यान आता राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनी यावर भाष्य केलं आहे. “प्रत्येक पक्षाला ऊन-सावली असतेच, पंकजा मुंडे भाजपा सोडणार नाही” असं म्हटलं आहे. महादेव जानकर यांनी आज श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले. रासपने कॅबिनेट मंत्रिपदाची मागणी यापूर्वीच केली असल्याचे जानकर म्हणाले.
यावेळी पंकजा मुंडे यांच्या पक्ष नाराजीच्या चर्चेवर देखील त्यांनी प्रतिक्रिया दिली. प्रत्येकच पक्षाला ऊन-सावली असते. गोपीनाथ मुंडे यांचे संपूर्ण आयुष्य भाजपामध्ये गेले आहे, पंकजा मुंडे यांनी देखील पक्षासाठी मेहनत घेतली आहे, त्यामुळे त्या भाजपा सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाहीत” असं जानकर यांनी म्हटलं आहे. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी असं म्हटलं आहे.