कोल्हापूर | राष्ट्रवादी काँग्रेस नेते, माजी मंत्री, आमदार तथा कोल्हापूर जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ पुन्हा एकदा इडीच्या रडारवर आले आहेत. मुश्रीफ अध्यक्ष असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत सक्तवसुली संचनालया अर्थात ईडीने आज छापे टाकले.बँकेच्या मूख्य कार्यालयासह सेनापती कापशी शाखेवर हे छापे पडले आहेत. कोल्हापूर जिल्ह्याचे आर्थिक सत्ता केंद्र असलेल्या बँकेवर छापे पडल्याने एकच खळबळ उडाली आहे.
सध्या त्यांच्या संबधित कागदपत्रांची तपासणी सुरु केली आहे. तसेच सेनापती कापसी येथील जिल्हा बँकेच्या शाखेचीही तपासणी सुरु आहे. मागील काही दिवसांपूर्वी आमदार हसन मुश्रीफ यांच्या कोल्हापूर, पुण्यातील निवासस्थानी, सेनापती कापशी येथील साखर कारखाना व मुलीच्या घरी ईडीने छापे टाकले होते. यानंतर पुन्हा एकदा ईडीच्या अधिकाऱ्यांनी जिल्हा बँकेत छापा मारत कारवाई केली आहे.
जिल्हा बँकेचे अध्यक्ष हसन मुश्रीफ असल्याने कोणती कारवाई होणार याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. मागच्या वेळी टाकलेल्या छाप्यात काय सापडले, याची माहीती समजू शकली नाही मात्र गेली वीस दिवस हे वादळ शांत झालेले नाही, याची चर्चा कागल मतदारसंघात सुरु होती. बुधवारी सकाळी अकरा वाजता ईडीचे अधिकारी जिल्हा बँकेच्या शाहुपुरी मुख्यकार्यालयात पोहचले आहेत. त्यांनी तपासणी सुरु केली असून ईडीचे अधिकारी आल्याचे समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी जिल्हा बँकेच्या आवारात जमा होऊ लागले आहेत.