नवी दिल्ली | केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी आज रोजी केंद्रीय अर्थसंकल्प 2023 संसदेत सादर केला. यावेळी अर्थमंत्री सितारमन यांनी अनेक मोठ्या घोषणा केल्या आहेत.नरेंद्र मोदी यांच्या काळातील हे नववे बजेट आहे, तर निर्मला सितारमन यांनी सलग पाचव्यांदा अर्थसंकल्प सादर केला.केंद्रातील मोदी सरकारचा हा निवडणूकपूर्वीचा अर्थसंकल्प असल्याने सर्वांचेच या अर्थसंकल्पाकडे लक्ष लागून राहिले होते.
आज (बुधवार) सकाळी राष्ट्रपती दौपती मुर्मू यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाला औपचारिक मंजूरी दिली. त्यानंतर केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीतही अर्थसंकल्पाला मंजूरी देण्यात आली. त्यानंतर अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी संसदेत हा अर्थसंकल्प सादर केला. यंदाही सितारमन यांनी डिजीटल पद्धतीने अर्थसंकल्प सादर केला.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारची महत्वकांक्षी योजना असलेल्या पंतप्रधान आवास योजनेसाठी यंदाच्या अर्थसंकल्पात मोठी वाढ कऱण्यात आली.
अर्थमंत्री निर्मला सितारमन यांनी यंदा पीएम आवास योजनेसाठी तब्बल 79 हजार कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. हा निधी गेल्यावेळच्या निधीपेक्षा एकूण 66 टक्क्यांहून अधिक आहे. पंतप्रधान आवास योजनेसाठीचा निधी 66 टक्क्यांनी वाढवून 79 हजार कोटी केल्याने सरकारला सर्वसमावेशक आणि शेवटच्या घटकापर्यंतचे विकास ध्येय साध्य करण्यास अधिक मदत होणार आहे.
यासह ऊर्जा विभागासाठी 50 हजार कोटींची योजना राबवणार असल्याची घोषणा निर्मला सीतारामन यांनी केली. तसेच पायाभूत सोयीसुविधांसाठी सलग तिसऱ्या वर्षी निधीत वाढ कऱण्यात आली आहे. यंदा पायाभूत सोईसुविधांच्याकरिता निधी 33 टक्क्यांनी वाढून एकूण 10 लाख कोटींची तरतूद कऱण्यात आली आहे. एकूण GDP च्या ही रक्कम 3.3 टक्के इतकी आहे.