पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत ‘माझी माती, माझा देश’ अभियानांतर्गत महाराष्ट्र अमृत कलश संकलन कार्यक्रमाचे आयोजन
पुणे : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली “मेरी माटी मेरा देश” म्हणजेच “माझी माती माझा देश” अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत देशभरातून माती कलशात संकलित करुन अमृत वाटिकेची निर्मिती करण्यात येणार आहे. या उपक्रमा अंतर्गत आद्यक्रांतिगुरु लहुजी वस्ताद साळवे यांच्या स्मृती स्मारकाची माती संकलित करुन भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना हा कलश सुपूर्द करण्यात आला. यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेजी व पदाधिकारी उपस्थित होते. देशभरात सुरू असलेल्या ‘माझी माती माझा देश’ अभियानांतर्गत राष्ट्रीय सेवा योजना, नेहरू युवा केंद्र आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्या माध्यमातून राज्यात झालेले कार्य कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
सी.ओ. ई. पी. तांत्रिक विद्यापीठ येथे नेहरू युवा केंद्र संघटक, राष्ट्रीय सेवा योजना महाराष्ट्र आणि उच्च व तंत्रशिक्षण विभाग यांच्यावतीने आयोजित महाराष्ट्र अमृत कलश संकलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी माजी केंद्रीय मंत्री जे. पी. नड्डा, आमदार चंद्रशेखर बावनकुळे, सावित्रीबाई फुले विद्यापिठाचे कुलगुरु सुरेश गोसावी, माझी माती माझा देश या उपक्रमाचे राज्याचे संयोजक राजेश पांडे, विविध विद्यापीठाचे कुलगुरू, राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘माझी माती माझा देश’ हा उपक्रम संपूर्ण देशभरात सूरू आहे. या उपक्रमांतर्गत राज्यातील प्रत्येक गावातील पवित्र माती संकलित करून देशाच्या राजधानीत अमृत वाटीका तयार करण्यात येणार आहे. देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान करणारे, स्वातंत्र्यलढ्यात सहभाग घेणारे आणि स्वातंत्र टिकवण्यासाठी देशाच्या सिमेवर तैनात असलेल्या सैनिकांना वंदन करण्यासाठीचा हा कार्यक्रम आहे.
महाराष्ट्रात ५ हजार महाविद्यालये व ४२ विद्यापीठे आहेत. त्यामध्ये ३३ लाख विद्यार्थी शिक्षण घेत असून २ कोटी नागरिक देशभक्तांच्या भूमीतील मातीसोबत सेल्फी घेऊन विक्रम करतील असा प्रयत्न आहे. त्यापैकी ५० लाख सेल्फीचे उद्दिष्ट उच्च व तंत्रशिक्षण विभाग पूर्ण करेल, अशी ग्वाही देवून संपूर्ण देशभरात १४२ कोटी नागरिकांच्या मनात राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होण्याच्यादृष्टीने हा स्तुत उपक्रम असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.