गेल्या काही दिवसांपासून महाप्रबोधन यात्रेच्या माध्यमातून ठाकरे गटातील नेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील नेत्यांवर टीकेची झोड उडवली आहे.यावरून ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे गटाचे नेते नरेश म्हस्के यांनी अंधारे यांच्यावर हल्लाबोल केला. ठाण्यात त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.सुषमा अंधारे यांनी हिंदुत्वाच्या विरोधात अनेकदा भूमिका घेतली आहे. पण आता त्या बोलक्या पोपटासारख्या जेवढे बोलायचं, तेवढेच बोलतात, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.
कालपर्यंत या बाई हिंदुत्वाच्या विरोधात बाळासाहेबांच्या तसेच उद्धव ठाकरेंच्या विरोधात बोलत होत्या. प्रभू रामचंद्रांच्या विरोधात तसेच हिंदू देवतांच्या विरोधातदेखील बोलत होत्या.काल त्या कुराणातल्या आयत सांगत होत्या, आता त्या आम्हाला हिंदुत्व शिकवतात. दहीहंडीला उद्धव साहेबांनी आपल्या मुलाला खांद्यावर घ्यावं, अशी टीकाही अंधारे यांनी केली होती.
आदित्य ठाकरे यांच्या बिहार दौऱ्यावरही म्हस्के यांनी भाष्य केले. उद्धव ठाकरे गटाने मुंबई महानगर पालिका निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. उत्तर भारतीयांची मोठ्या प्रमाणावर संख्या आहे. त्यांची मते मिळावी, यासाठी त्यांच्यात सहानुभूती निर्माण व्हावी, याकरिता बिहारचा दौरा आयोजित करण्यात आला असावा. लालू प्रसाद यादव यांनी कायमच शिवसेनेला विरोध केला आहे. बाळासाहेबांच्या विरोधात ते कायमच बोलत आले आहेत. आता हीच लोकं ठाकरेंना जवळची वाटत आहेत,अशा शब्दात म्हस्के यांनी उद्धव ठाकरेंना खडेबोल सुनावले.