Latest Marathi News

BREAKING NEWS

निवडणूक आयोगाकडे शिवसेनेचं प्रकरण गेल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांची प्रतिक्रिया

0

 

शिवसेनेवर शिंदे गटाने केलेल्या दाव्याची सुनावणी करण्यास सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला हिरवा कंदील दाखवल्यानंतर निकालावर अनेक प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवसेना-शिंदे गटाच्या सुनावणीमुळे सर्वोच्च न्यायलयाने समोर आलेली एक चांगली संधी गमावली असल्याची प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केली आहे. ‘निवडणूक चिन्ह कायद्यातील’ कलम 15 संविधानाच्यादृष्टीने योग्य आहे की नाही हे तपासता आले असते. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने ही संधी गमावली असल्याचे प्रकाश आंबेडकर यांनी सांगितले.

मंगळवारी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने शिवसेनेच्या निवडणूक चिन्हाबाबतची सुनावणी करण्यास मंजुरी दिली. शिंदे गटाने शिवसेना पक्ष आमचाच असल्याचा दावा करत निवडणूक आयोगात धाव घेतली. तर, दुसऱ्या बाजूला शिंदे गटातील आमदारांची अपात्रता आणि इतर मुद्यांवर सु्नावणी पूर्ण झाल्याशिवाय निवडणूक आयोगाने सुनावणी घेऊ नये अशी मागणी करणारी याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती.

मंगळवारी सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठाने याचिकेवर सुनावणी करताना निवडणूक आयोगास सुनावणी घेण्यास मुभा देण्यात आली. या सुनावणीत शिंदे गट आणि निवडणूक आयोगाच्या वकिलांनी बाजू मांडताना निवडणूक आयोग घटनात्मकदृष्ट्या स्वतंत्र संस्था असल्याचा मुद्दा अधोरेखित केला होता. प्रकाश आंबेडकर म्हणाले की, शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय सर्वानाच बंधनकारक आहे. परंतु या निर्णयाचा आदर राखला जाईल का या बाबत शंका असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.