तेहरान : इराणने बॅलेस्टिक मिसाईल्सचा वापर करून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतन्याहू यांचा कैसरिया व्हिला तसेच हदेरा उर्जा प्रकल्प क्षेपणास्त्राद्वारे उद्ध्वस्त केल्याचा दावा केला जात आहे. काही माध्यमांनी ड्रोन हल्ला करण्यात आल्याचे म्हटले आहे. नेतन्याहू आणि त्यांच्या पत्नी व्हिलामध्ये नसल्यामुळे त्यांना धोका पोहोचला नाही.
इस्रायलच्या लष्कराने तेहरान तसेच मंत्रालयावर हल्ला केल्यानंतर इराणने प्रत्युत्तरादाखल ही मोठी कारवाई केल्याचे म्हटले जात आहे. याआधी इस्रायलने शुक्रवारी (१३ जून) इराणच्या अणूउर्जा प्रकल्पांवर तसेच इतर १०० पेक्षा अधिक महत्वाच्या ठिकाणांवर हल्ले केले. तेव्हापासून इराणही इस्रायलला चोख प्रत्युत्तर देत आहे. आता हा संघर्ष रोज वाढतच जात आहे. दरम्यान, आता नेतन्याहू यांच्या कुटुंबाच्या व्हिलालाच लक्ष्य करण्यात आल्याचे सांगितले जात असल्यामुळे आगामी काळात युद्ध नेमके कोणत्या वळणावर पोहोचणार याकडे संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे.