पेण: पेण ही महाराष्ट्रालाच नाही तर जगाला गणरायाची मूर्ती पुरवणार्या कारागिरांची नगरी आहे. असा पारंपारिक व्यवसाय करणार्या बारा बलुतेदारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी विश्वकर्मा योजना आणली. यामार्फत पारंपरिक ज्ञानाला आधुनिकतेची जोड देत पहिल्यांदा या व्यवसायिकांचा विचार करण्यात आला. यासोबतच मोदीजी यांनी शेतीवरील गुंतवणूक चारपट वाढवली. मासेमारीसाठी पहिल्यांदा मासेमारी मंत्रालय तयार करून ‘निलक्रांती’ सारखी योजना आणली. याचा कोळी बांधवांना मोठ्या प्रमाणात फायदा होत आहे. यामुळे पेणच्या गणरायाच्या आशीर्वादाने महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे रायगडचे खासदार होणार असा विश्वास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
पुढे बोलताना फडणावीस म्हणाले, मागील काळात आम्ही पेणला पाणी देण्याची योजना आणली होती परंतु मध्यंतरीच्या काळात आलेल्या उद्धव ठाकरेंच्या सरकारने त्यावर स्थगिती आणली. नवे सरकार आल्याबरोबर ती दूर करण्यात आली. येत्या काळात बाळगंगा धरणाचे सर्व प्रश्न सोडवून या भागातील पिण्याच्या आणि सिंचनाच्या पाण्याचे सर्व प्रश्न सोडविण्यात येतील.
कोविड काळात वेळीच लसींच्या संशोधनाला प्रोत्साहन देऊन त्याचे मोफत वितरण करत या देशाला वाचवण्याचे काम पंतप्रधान मोदीजी यांनी केले. ही निवडणूक येणार्या पिढ्यांचे भाग्य आणि भविष्य बदलणारी आहे. संपूर्ण पेण सुनील तटकरे यांच्या पाठीशी असून त्यांना दिलेले प्रत्येक मत हे मा. मोदीजी यांना दिलेले मत आहे. असे फडणवीस म्हणाले.
यावेळी बोलताना सुनील तटकरे म्हणाले, परराष्ट्र धोरण, परराष्ट्र नीती व्यवस्थितपणे मा. नरेंद्र मोदी जी हाताळत आहेत. खंडप्राय देशात ठळकपणे सर्वसामान्य योजना नियोजन पध्दतीने राबवल्या जात आहेत. अटलसेतूमुळे कोकणच्या विकासाचे स्वप्न पूर्ण झाले आहे. कोस्टल हायवेचे काम पूर्णत्वाकडे जात आहे. ७०० कोटी रुपये नितीन गडकरी जी यांनी हायवेसाठी दिले आहेत. २०२४ अखेर पर्यंत पर्यंत ४जी आणि ५जीचे नेटवर्क पूर्ण केले जाईल, पेणच्या ऐतिहासिक नगरीतील गणरायाच्या आशिर्वादाने मा. नरेंद्र मोदी यांना तिसर्यांदा पंतप्रधान करतानाच ४०० पार आकडा गाठला जाईल, असा विश्वास सुनील तटकरे यांनी व्यक्त केला.
दरम्यान, अनंत गीते, भाजपाचे कव्हर होते म्हणून तुम्ही निवडणूक लढलात. सलग दोनवेळा मंत्री असूनही एका फुटक्या कवडीचे काम तुम्हाला मतदारसंघात करता आले नाही, अशी खंत व्यक्त करत तटकरे यांनी मुंबई मनपा जशी उबाठाचा आत्मा आहे, तशी रायगडची जिल्हा परिषद शेकापचा आत्मा आहे. त्यामुळे रायगड आणि मुंबईतील आगामी निवडणुकीत महायुतीचे एकत्रित झेंडा फडकवूया असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.