वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी अनेकदा केंद्रातील मोदी सरकार विरोधात तोफ डागली आहे मोदी हे देशासाठी धोकादायक असल्याचे मोठे विधान त्यांनी एका कार्यक्रमात केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे आता देशाला धोकादायक झाले आहेत. त्यांना समर्थन देणार्या हिंदू संघटनांनी आता यावर फेरविचार केला पाहिजे असे म्हणत प्रकाश आंबेडकरांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली.
तसेच प्रकाश आंबेडकर यांनी मणिपूरच्या मुद्यावरुन देखील मोदींवर निशाणा साधला. मोदींनी सर्वात आधी मणिपूरमध्ये मैतेई जातीला आदिवासींचा दर्जा का दिला? तशी मागणी होती का? हे त्यांनी स्पष्ट करावं असे आंबेडकर म्हणाले. दरम्यान, यावेळी बोलताना आपण आगामी लोकसभा अकोल्यातूनच लढणार असल्याचे स्पष्टीकरण देखील त्यांनी दिले.
प्रकाश आंबेडकर यांनी एका प्रसिद्ध वृत्त माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत हा आरोप केला आहे. यावेळी त्यांनी सध्याच्या अनेक राजकीय मुद्द्यांवर मनमोकळा संवाद साधला. मणिपूर, अविश्वास ठरावावरील पंतप्रधान मोदींचं भाषण, संसदेत राहूल गांधींच्या ‘फ्लाईंग किस’वरून भाजपनं उठवलेली राळ, नवी तयार झालेली ‘इंडिया आघाडी’, सध्याची काँग्रेसची भूमिका, उद्धव ठाकरेंबद्दल आंबेडकरांचं मत, महाविकास आघाडीत वंचितची संभाव्य एंट्री अशा विविध मुद्यांवर त्यांनी संवाद साधला.
मणिपूरच्या प्रश्नाचा आर्थिक धाग्यानं विचार करता भाजपला जो पॉलिटिकल फंड मिळतो त्यात चिनी कंपन्यांनी मदत केली आहे का? असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला. त्यामध्ये चीनने उडी मारली तर बोंबलता कशाला? असेही ते म्हणाले. मी अदानी आणि मणिपूर संबंध यावर नंतर सविस्तर बोलेन असेही आंबेडकर म्हणाले.