मुंबई | शेअर बाजाराच्या कर्मचाऱ्यांचे अवैधरीत्या फोन टॅपिंग केल्याच्या प्रकरणात झालेल्या आर्थिक व्यवहारांप्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांना ईडीने मंगळवारी रात्री अटक केली. मंगळवारी पांडे यांची ईडीने सुमारे सात तास चौकशी केली आणि त्यानंतर त्यांना अटक केली. बुधवारी त्यांना ईडीच्या दिल्ली येथील विशेष न्यायालयात हजर केले जाणार आहे.
२००९ ते २०१७ या कालावधीत राष्ट्रीय शेअर बाजारातील तीन संवेदनशील विभागांतील कर्मचाऱ्यांचे फोन टॅपिंग झाले होते. हे काम पांडे यांच्या आयसेक कंपनीने केले होते, तसेच या कामाकरिता त्यांना साडेचार कोटी रुपये मिळाल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवला होता. या प्रकरणी झालेल्या आर्थिक व्यवहारांसंदर्भात ईडीने पांडे यांचा मनी लॉड्रिंग कायद्यातील फौजदारी कलमांतर्गत जबाब नोंदवत अटक केली आहे.
तसेच याच प्रकरणामध्ये ईडीने गेल्याच आठवड्यात राष्ट्रीय शेअर बाजाराच्या माजी मुख्याधिकारी चित्रा रामकृष्ण यांची कस्टडी घेतली होती. राष्ट्रीय शेअर बाजारात को-लोकेशन घोटाळा झाला त्यावेळी तेथील सायबर सिक्युरिटी ऑडिटचे काम पांडे यांच्या आयसेक कंपनीला मिळाले होते. त्यामधील आर्थिक व्यवहारांचीदेखील चौकशी ईडीने आता सुरू केल्याचे समजते.