Latest Marathi News

BREAKING NEWS

मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी आशिष शेलार विरोधात शरद पवार रंगणार सामना

0

मागच्या काही दिवसांपासून राज्यात राजकीय घडामोडी सुरू असताना पुन्हा एका निवडणुकीसाठी दोन बड्या नेत्यांमध्ये अटीतटीचा सामना होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे नेते आणि भाजपा मुंबई अध्यक्ष आशिष शेलार हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि राज्यसभा खासदार शरद पवार यांच्याविरोधात निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत.

आशिष शेलार यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे शरद पवार गट विरुद्ध आशिष शेलार अशी चुरशीची लढत पाहायला मिळेल. शरद पवार गटाकडून भारताचे माजी क्रिकेटपटू संदीप पाटील अध्यक्षपदासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २० ऑक्टोबरला एमसीएची निवडणूक पार पडणार आहे.

एमसीए अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची आजची शेवटची मुदत आहे. याअगोदर शरद पवार यांनीदेखील एमसीएचे अध्यक्षपद भूषविले आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन ही प्रशासकीय संस्था आहे. एमसीएच्या कार्यक्षेत्रात पश्चिम उपनगरामधील डहाणू, मध्य उपनगरातील बदलापूर आणि खारघरपर्यंत नवी मुंबईचा समावेश आहे. आता पवार गटाच्या उमेदवाराविरोधात शेलार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा आहे.

दरम्यान मुंबई क्रिकेट असोसिएशनची स्थापना १९३० मध्ये झाली. मुंबईत झालेल्या द्विवार्षिक निवडणुकीत विजय डी. पाटील यांचा २७ मतांच्या फरकाने पराभव करून शरद पवार यांची मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अध्यक्षपदी फेरनिवड झाली होती. एमसीए अध्यक्षपदासाठी पवार यांनी पाटील यांचा १७२-१४५ असा पराभव केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.