मुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच एकनाथ शिंदे हे आपल्या दरे या मूळ गावी आले. रात्री उशीरा मुख्यमंत्री शिंदे हे गावात पोहोचले. मात्र, गावकऱ्यांनी धुमधडाक्यात त्यांचे स्वागत केले. दरे गावाच्या वेशीपासून गावापर्यंत एकनाथ शिंदे यांची ढोल ताशांच्या तुतारीच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक काढत स्वागत करण्यात आले. यावेळी फटाक्यांची आतषबाजीही करण्यात आली. मुख्यमंत्री झालेला आपल्या गावचा सुपुत्र गावात येणार म्हटल्यानंतर गावातल्या लोकांमध्ये एक वेगळाच उत्साह पाहायला मिळाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे दरे गावात आगमन झाल्यानंतर त्यांच्या गाडीवर फुलांचा वर्षाव देखील करण्यात आला.यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासोबत त्यांच्या पत्नी, त्यांचा मुलगा खासदार डॉ. श्रीकांत शिंदे आणि सून नातू सर्व कुटुंब उपस्थित होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते प्रथमच आपल्या मुळ दरे या गावी आले. तापोळ्यात आल्यानंतर एकनाथ शिंदे यांचं जंगी स्वागत करण्यात आले. जोरदार वारे आणि तुफान पाऊस असतानाही मुख्यमंत्री शिंदे यांच्या स्वागतासाठी शेकडो ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते.
पावसाळी अधिवेशनापुर्वी एकनाथ शिंदे यांनी ग्रामदैवत आणि कुलदैवताचे दर्शन घेतले. मुख्यमंत्री झाल्याबद्दल दरे ग्रामस्थांच्यावतीने त्यांचा नागरी सत्कारही करण्यात येणार आहे. आज (12 ऑगस्ट) दुपारी 1 वाजता ते दरे येथून मुंबईकडे रवाना होणार आहेत. सातारा जिल्ह्यातील दरे (ता. महाबळेश्वर) गावचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले आहेत.