नवी दिल्ली | दिल्लीमध्ये कोरोना संसर्गाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. गेल्या 24 तासांत 2700 हून अधिक नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. दिल्ली सरकारच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या हेल्थ बुलेटीननुसार, गेल्या 24 तासांत 2726 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
दिल्लीमध्ये यावर्षी 2 फेब्रुवारीनंतर एका दिवसांत झालेली ही सर्वात मोठी वाढ आहे. तसेच, काल दिवसभरात सहा लोकांचा मृत्यू झाला आहे. तर दिल्लीचा पॉझिटिव्हिटी रेट 14.38 टक्क्यांवर पोहोचला आहे. महाराष्ट्रातही कोरोनाचा आलेख दिवसागणिक वर जाताना दिसत आहे. वाढत्या रुग्णसंख्येमुळं दिल्लीत मास्कसक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे आता राज्यातही पुन्हा एकदा मास्कसक्ती होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
दिल्लीतील कोरोना रुग्णांनी गेल्या साडेसहा महिन्यांचा विक्रम मोडला आहे. यापूर्वी 2 फेब्रुवारी रोजी 3028 रुग्ण आढळून आले होते. सक्रिय रुग्णांची संख्या गुरुवारी 8840 वर पोहोचली, जी गेल्या सहा महिन्यांतील सर्वाधिक रुग्णसंख्या आहे. यापूर्वी 6 फेब्रुवारी रोजी सक्रिय रुग्णांची संख्या 8869 इतकी होती. दिल्ली सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या 5591 रुग्ण होम आयसोलेशनमध्ये आहेत. दिल्लीतील विविध रुग्णालयांमध्ये कोरोनाचे 523 रुग्ण दाखल आहेत.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे दिल्लीकरांची चिंता वाढवली आहे. देशात पहिल्यांदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्यानंतर दिल्लीतील सार्वजनिक ठिकाणांवर मास्क अनिर्वाय करण्यात आलं होतं. काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकानं देशात मास्कमुक्ती केली होती. पण पुन्हा एकदा कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्याची वेळ आली आहे.