मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद माझ्याकडे देण्याची मागणी केली. एकदा सरकार माझ्या हाती द्या महाराष्ट्र सुतासारख सरळ करतो, असे वारंवार राज ठाकरे आपल्या भाषणात बोलत असतात.याच पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना मुख्यमंत्री म्हणून सहा महिने दिले तर काय कराल असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर ‘सहा महिने, एक दिवस, पाच दिवस असं मला सांगता येणार नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या सहज बदलण्यासारख्या आहेत’, असे ठाकरेंनी उत्तर दिले.
राज ठाकरे यांची एका कार्यक्रमात राष्ट्रवादीचे नेते अमोल कोल्हे आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी मुलाखत घेतली. त्यावेळी अमृता फडणवीस यांनी राज ठाकरे यांना जर तुम्हाला मुख्यमंत्री म्हणून सहा महिने दिले तर काय बदल कराल असा प्रश्न विचारला. यावर राज ठाकरेंनी आपल्याच शैलीत उत्तर दिले.
“सहा महिने, एक दिवस, पाच दिवस असं मला सांगता येणार नाही. माझ्याकडे अनेक गोष्टी आहेत ज्या सहज बदलण्यासारख्या आहेत. आपल्या देशात कायदे आहेत. लॉ आहे पण ऑर्डर नाही. ऑर्डरची गरज आहे आणि त्या सुरळीत होऊ शकतात. मुंबई पोलीस महाराष्ट्र पोलिसांवर माझा शंभर टक्के विश्वास आहे. त्यांच्या हाती ४८ तास द्या आणि त्यांना सांगा मला महाराष्ट्र साफ करून द्या. सगळ्या गोष्टी त्यांना माहित असतात. ऑर्डर नसतात. पोलिसांनी भूमिका घेतल्यानंतर त्यांना जेलमध्ये जावे लागत असेल तर का जातील आणि कोणासाठी ते जेलमध्ये जातील”, असे उत्तर दिले.
शिवाय, बसलेलाच माणूस टेम्पररी आणि त्याच्यासाठी आम्ही परमनंट जेलमध्ये जायचं याला काही अर्थ आहे का?” असा सवालही राज ठाकरे यांनी केला. तसेच, ‘एखाद्या पोलीस अधिकाऱ्यालाच मुख्यमंत्री करायला हवं असं अमृता फडणवीस यावेळी म्हणाल्या. यावर आपल्याकडे उत्तम काम करणारे पोलीस अधिकारी आहेत असं राज ठाकरे म्हणाले. महाराष्ट्र त्याबाबतीत भाग्यवान आहे. पोलिसांना फक्त ४८ तासांसाठी मोकळा हात द्या’, असेही राज ठाकरे म्हणाले.