राज्यातील सत्तासंघर्षानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटातील बंडखोर आमदार आपापल्या मतदारसंघात पोहचले आहेत. बंडखोर आमदारांनी मतदार संघात पोहचताच पत्रकार परिषदा घेत शिवसेनेतील नेत्यांना टार्गेट करण्यास सुरवात केलीये. तर दुसरीकडे आता माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी थेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे.
मंगळवारी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी शिवसेना पक्ष कार्यालयात आम्ही तयार होतो मात्र, मुख्यमंत्री शिवसेना पक्ष कार्यालयात आलेच नाही. ते स्वतःला शिवसैनिक म्हणुन घेतात. आम्ही शिवसैनिक आहेत असे ते वारंवार सांगतत, पण आम्ही त्यांच्यासाठी पुष्पहार घेऊन थांबलो होतो, मात्र ते आलेच नाहीत. तर दुसरीकडे महानगरपालिका मुख्यालयातील भाजपच्या कार्यालयाला भेट देऊन ते निघून गेले, असा टोला माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी बुधवारी लगावला.
राज्यात शिंदे-भाजप सरकार स्थापन झाले. यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर त्यांनी पहिल्यांदाच मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयाला भेट दिली. मुख्यालयातील आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्र्यांनी मुंबईतील परिस्थितीचा आढावा घेतला. यानंतर ते मुख्यालयातील शिवसेनेच्या पक्ष कार्यालयात न जाता भाजपाच्या कार्यालयात गेले. यावरून सध्या पालिकेत चांगलेच राजकीय वातावरण तापले असून चर्चांना उधाण आले आहे.