Latest Marathi News

BREAKING NEWS

…. म्हणून उद्धव ठाकरे गादीवर बसले, रामदास कदम यांची पुन्हा घणाघाती टीका

0

शिवसेनेत बंडखोरी केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. तसेच मूळ शिवसेनेत शिंदे आणि ठाकरे असे दोन गट निर्माण झाले. तेव्हापासून शिंदे गटात गेलेले रामदास कदम हे ठाकरे गटातील नेत्यांवर गंभीर आरोप करत आहेत. दरम्यान, रामदास कदम यांनी आताही उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. “उद्धव ठाकरे यांनी शिवसेना शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधली.” असे ते म्हणाले. उद्धव ठाकरेंचे कर्तृत्व काय? फक्त बाळासाहेबांचे चिरंजीव म्हणून उद्धव ठाकरे गादीवर बसले.” असेही ते म्हणाले.

माजी परिवहन मंत्री आणि शिवसेना नेते अनिल परबयांच्यावरही त्यांनी जोरदार टीका केली आहे. “अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा असून शिवसेनेच्या फुटीला तेच जबाबदार आहे. त्यामुळे त्यांची ईडी चौकशी झालीच पाहिजे. त्यांची जागा जेलमध्येच आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझा मुलगा दापोलीत शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता.” असे त्यांनी सांगितले.

दरम्यान, रामदास कदम यांचे पुत्र आमदार योगेश कदम यांच्या कारचा भीषण अपघात झाला आहे. निकटवर्तीय आणि कार्यकर्त्यांकडून या अपघाताच्या सखोल चौकशीची मागणी होत आहे. पाठून येणाऱ्या टँकरने आमदार कदमांच्या कारला जोरदार धडक दिली आणि हा टँकर पलटी झाला. तसेच, टँकर चालक फरार झाल्याने अनेकांना हा अपघात नव्हे, तर घातपात असल्याची शंका आहे. सुदैवाने आमदार योगेश कदम सुखरूप असून त्यांना कोणतीही दुखापत झालेली नाही मात्र हा घातपात असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.