शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर संपूर्ण शिवसेना फुटण्याच्या वाट्यावर आहे अशातच एकनाथ शिंदेसेनेच्या बंडखोरीमुळे खोळंबलेल्या आघाडी सरकारला आज काही महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागणार आहेत. विशेषतः शिवसेना आणि उद्धव ठाकरे सरकारसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. शिवसेनेतून बाहेर पडलेले एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सोबतचे आमदारही आज एक ठोस निर्णय घेऊन पुढे येतील, अशी माहिती गुवाहटीतील सूत्रांनी दिली आहे.
एकनाथ शिंदेंचा गट हीच शिवसेना असा दावा करणारे एक पत्र आज शिंदे गटाकडून राज्यपालांना देण्यात येईल. तशी तयारीही शिंदेंकडून सुरु करण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. तर इकडे शिवसेना भवनात शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक बोलावण्यात आली आहे. यासाठी महत्त्वाचे शिवसेना नेते आता मुंबईच्या दिशेने निघाले आहेत.
शिवसेनेचे वरिष्ठ नेते भास्कर जाधवदेखील शिवसेनेच्या बैठकीसाठी मुंबईच्या दिशेने रवाला झाले आहेत. काल भास्कर जाधव मुंबईतून अचानक गायब झाल्यामुळे ते गुवाहटीच्या दिशेने गेल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र एकनाथ शिंदेंनी या वृत्ताला दुजोरा दिला नाही. अखेर भास्कर जाधव हे त्यांच्या भावाच्या शस्त्रक्रियेसाठी काल चिपळूणला गेले असल्याची माहिती पुढे आली. आज सकाळीच चिपळूणकडून भास्कर जाधव मुंबईकडे रवाना झाल्याची माहिती समोर आली आहे.