ज्येष्ठ कवी-गीतकार जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन एका कार्यक्रमात मुंबईवरील २६/११च्या दहशतवादी हल्ल्याचे सूत्रधार अजूनही पाकिस्तानात मोकाट फिरत असल्याचे म्हणत पाकिस्तानला खडेबोल सुनावले. लाहोरमध्ये नुकत्याच झालेल्या ‘फैज उत्सवा’त एका प्रश्नाचे उत्तर देताना अख्तर यांनी आपल्या भावना व्यक्त करताना वरील विधान केले. जावेद अख्तर यांच्या या कृतीवरून ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज माध्यमांशी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निशाणा साधला आहे.
‘भारतात बसून पाकिस्तानला सुका दम देणं… ठीक है होता है. पण तिकडे जाऊन बोलण्याची हिंमत दाखवणे याला ५६ इंचापेक्षाही मोठी छाती आहे, असे मी मानतो. जावेद अख्तर यांचे अभिनंदन मीच कशाला संपूर्ण देशाने करायला पाहिजे. जावेद अख्तर यांचे अभिनंदन पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, सरसंघचालक मोहन भागवत यांनीही करायला हवे. सर्जिकल स्ट्राईक झाल्यावर निवडणुकीच्या अगोदर जो काय प्रकार झाला, त्यानंतर भाजपाच्या लोकांनी अनेक ठिकाणी फटाके फोडले.
जसेकी पाकिस्तान जगाच्या नकाशावरून गायब झाला. त्यावेळी आम्हालाही आनंद झाला होता. पण ज्या पद्धतीने जावेद अख्तर यांनी पाकिस्तानात जाऊन पाकिस्तानची धुलाई केली. याला एक हिंमत लागते, धाडस लागते. म्हणून भाजपने आणि या देशातील सर्वच राजकीय पक्षाने सुद्धा त्यांच्या हिंमतीला दाद देऊन, त्यांचे अभिनंदन करणे आपले कर्तव्य आहे, असे आम्ही मानतो आणि आम्ही ते सामनाच्या माध्यमातून केले, असेही संजय राऊत म्हणाले.