Latest Marathi News

BREAKING NEWS

मेडिकल कॉलेजचे काम बंद पडू दिले जाणार नाही

0

मेडिकल कॉलेजचा प्ररश्‍न सातारा जिल्ह्यासाठी कळीचा आहे. त्याचे काम कधीही बंद पडू दिले जाणार नाही. संबंधित आंदोलनकर्त्यांनी व्यवस्थापनाशी अथवा माझ्याशी चर्चा करणे गरजेचे होते.जलसंपदाच्या करार तत्वावरील जागेमध्ये राहणारे गाळेधारक आणि कुटुंबीय यांच्याशी चर्चा करून समन्वयाने मार्ग काढला जाईल. त्यानंतरही कोणी हे काम बंद पाडण्याचा प्रयत्न केला तर ते खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा उत्पादन शुल्क मंत्री व पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने गेल्या शंभर दिवसात राज्यासाठी जे महत्त्वाचे निर्णय घेतले त्या संदर्भातील माहिती देण्याकरता शंभूराज देसाई पत्रकार परिषदेत बोलत होते. राज्य शासनाने काढलेल्या जनकल्याणाच्या 700 अध्यादेशांची माहिती त्यांनी पहिल्या टप्प्यात दिली.

देसाई म्हणाले, “”राज्य शासनाने आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी जिरायती क्षेत्रासाठी साडेतेरा हजार रुपये आणि बागायती क्षेत्रासाठी साडेसव्वीस हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचा निर्णय घेतला आहे. आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दोन हेक्‍टरपर्यंतची मुदत तीन हेक्‍टरपर्यंत वाढवण्यात आली. राज्य शासनाने नियमितपणे कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता.

त्याचा लाभ जिल्ह्यातील तीन लाख 85 हजार 101 शेतकऱ्यांना झाला असून त्या माध्यमातून त्यांना 880 कोटीची मदत झाली आहे. कोयनानगर येथे एनडीआरएफच्या धर्तीवर पोलीस प्रशिक्षण केंद्र मंजूर झाले असून त्याकरिता महसूल विभागाची जागा उपलब्ध झाली आहे. त्याला मुख्यमंत्र्यांनी प्रशासकीय मान्यता दिली आहे. याशिवाय जिल्ह्यामध्ये सर्व सुविधांनी युक्त अशी 15 मॉडेल स्कूल आणि 17 प्राथमिक आरोग्य केंद्रे निर्माण केली जाणार असून त्यासाठी राज्य शासन तसेच डीपीडीसी या माध्यमातून निधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.