खालापूर | रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडी येते झालेल्या दुर्घटनेनेनंतर माजी मुख्यामंत्री उद्धव ठाकरे यांनी आज भेट दिली यावेळी त्यांना धीर देत आज मी तोंड दाखवायला आलो नाही. तुमचं व्यवस्थित पुनर्वसन होईपर्यंत मी तुमच्यासोबत राहील. आसपासच्या वस्त्यांशीही संपर्क करू. तुमच्या सर्वांचं पुनर्वसन एका व्यवस्थित जागी करू. तुम्हाला पुन्हा संकटाचा सामना करावा लागू नये याची खबरदारी घेऊ, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांना दिलासा दिला आहे. इर्शाळगड दुर्घटनेतील पीडितांशी ते संवाद साधत होते. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
खालापूर येथील इर्शाळवाडी गावात उद्धव ठाकरे आज पोहोचले. त्यांच्यासोबत खासदार राजन विचारे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब आणि सुनील प्रभू आदी उपस्थित होते. दरवेळी अशा दुर्घटना घडत असतात. आपण फक्त धावतो. मी यात राजकारण करत नाही. पण राजकारण्यासाठी ही लाजीरवाणी गोष्ट आहे. आजही अनेक वस्त्या आहेत. त्या डोंगर उतरावर किंवा डोंगराच्या खाली आहेत. तिथे कधीही दरडी कोसळू शकतात, असं उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, मागे मी इथे आलो होतो. तेव्हा वीज नव्हती. वीज देण्याचा प्रयत्न केला होता. महाराष्ट्रात अनेक वस्त्या आहेत. दुर्घटना कधीही होऊ शकतात. पण म्हणून जबाबदारी टाळू शकत नाही. हा अनुभव येण्याआधी पुनर्वसन झालं असतं तर चांगलं झालं असतं. केवळ घर देणं म्हणजे पुनर्वसन होणं नाही. त्यांना नोकरी कशी मिळेल, रोजगार कसा मिळेल हे पाहा. कंटनेरमध्ये जास्तीत जास्त दिवस राहणार नाही याची काळजी घ्या. यात मी राजकारण आणत नाही. दु:ख मोठं आहे. सावरावं लागेलच. आम्ही तुमच्यासोबत राहू. नीट काळजी घ्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.