सर्वांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांची श्री गणरायाच्या चरणी प्रार्थना
पुणे , २८ सप्टेंबर : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया! पुढच्या वर्षी लवकर या!आज पुण्यात गणेश विसर्जन मिरवणुकीस अतिशय जल्लोषात सुरुवात झाली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज मिरवणूक सुरु होताच मानाच्या पाचही गणपतींचे दर्शन घेतले.
भारतीय स्वातंत्र्य चळवळीचे जनक, सार्वजनिक गणेशोत्सवाचे प्रणेते लोकमान्य टिळकांना अभिवादन करुन मानाचा पहिला कसबा गणपती आणि मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीचे दर्शन घेऊन मनोभावे पूजा केली. गणेशोत्सव काळात पाऊस सर्वत्र बरसत आहे. त्यामुळे बळीराजा सुखावतो आहे. संपूर्ण महाराष्ट्रावर अशीच तुझी कृपादृष्टी राहू दे, अशी यावेळी चंद्रकांत पाटील यांनी गणराया चरणी आळवणी केली.
त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मानाचा तिसरा गुरुजी तालीम, चौथा तुळशीबाग आणि मानाचा पाचवा केसरी वाडा गणपतीचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले. सर्वांवर तुझी कृपादृष्टी अशीच राहू दे, अशी प्रार्थना पाटील यांनी श्री गणरायाच्या चरणी केली.