मुंबई | आज हैदराबाद मुक्ती संग्राम दिन आहे. या निमित्तानं महाराष्ट्र नवनिर्माण सेना प्रमुख राज ठाकरे यांनी एक पत्र लिहित हा दिवस सणासारखा साजरा झाला पाहिजे, असं आवाहन केलं आहे. आज मराठवाडा मुक्ती संग्राम दिन. मराठवाडा मुक्ती संग्राम हा काही विलीनीकरणाचा लढा नव्हता तर तो देशाच्या अखंडतेसाठी दिलेला लढा होता. हैद्राबादच्या निजामाचा हेतू साध्य झाला असता, तर भारताचं अखंडत्वच धोक्यात आलं असतं. त्यामुळे मराठवाड्यातील जनतेने जो लढा दिला तो देशाच्या अखंडत्वासाठी दिलेला लढा आहे, आणि म्हणून हा खरं तर आजचा दिवस, एखाद्या सणासारखाच साजरा व्हायला पाहिजे, असं राज ठाकरे यांनी म्हटलं आहे.
मराठवाडा मुक्ती संग्रामाचा इतिहास शाळेत शिकवा, अशी मागणी देखील राज ठाकरे यांनी केली आहे.मला नेहमी वाटतं की इतक्या मोठ्या लढ्याबाबत आपल्याकडे बऱ्यापैकी अनभिज्ञता आहे. मला अनंत भालेरावांचं या विषयावरचं पुस्तक वाचून लढ्याबद्दल काही गोष्टी कळल्या. मग पुढे नरहर कुरुंदकरांची या विषयावरची काही व्याख्यानं यूट्युबवर ऐकताना नवीन माहिती मिळत राहिली. पण एकूणच असं वाटतं की या इतक्या गौरवशाली लढ्याबद्दल फारसं कुणाला माहित नाही, असं राज ठाकरेंनी म्हटलं आहे.
माझं म्हणणं आहे की, आता जे नवं शिक्षण धोरण येत आहे. त्यानुसार त्या त्या राज्यातील पुसून टाकला गेलेला इतिहास शिकवला जाणार आहे. त्यामुळं मराठवाडा मुक्ती संग्रामाचा विस्तृत इतिहास पाठ्यपुस्तकांमध्ये शिकवला गेला पाहिजे. संयुक्त महाराष्ट्रासाठीचा लढा आणि मराठवाडा मुक्ती संग्रामाचा लढा हे महाराष्ट्राने आणि मराठी माणसाने कदापि विसरता कामा नये, असंही त्यांनी पत्रात म्हटलं आहे.